‘शिवाई’ ई-बस पुढील वर्षीच धावणार

करोना, लॉकडाऊनमुळे चीनमधून बांधणीकरिता सांगाडा उपलब्ध होण्यास अडचणी 

पुणे – एसटीची बहुचर्चित “शिवाई’ ही ई-बस आता पुढील वर्षीच धावणार, असे खात्रीलायक वृत्त आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर चीनमधून बांधणीकरिताचा सांगाडा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाल्याने काम रखडले आहे.

चीनमधून बांधणीकरिता तब्बल 50 बसचे सांगाडे उपलब्ध होणार होते. तसेच, 100 नव्या बस एका खासगी कंपनीमार्फत उपलब्ध केल्या जाणार होत्या. परंतु, करोनामुळे आणखी 5-6 महिने तरी बहुतांश व्यवहार ठप्पच राहणार असून करोनाचा “शिवाई’ला फटका बसणार आहे. परिणामी प्रवाशांना “शिवाई’ बसमधून प्रवास करण्यास आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागेल.

दरम्यान, पुढील वर्षीच्या मध्यावर (मे किंवा जून) “शिवाई’ ई-बसेस सुरू होतील, अशी माहिती एसटीच्या मुंबई विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात उद्‌घाटन झाले होते. जानेवारीपासून ती धावू लागेल, अशी माहिती त्यावेळी दिली होती. 

त्यानंतर ही तारीख बदलत मार्चपासून धावू लागेल, असे सूतोवाच तत्त्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. परंतु, मार्चपासून “शिवाई’ धावू शकलीच नाही, त्यानंतर लॉकडाऊनमुळे जूनची नवीन तारीख देण्यात आली. परंतु, करोनामुळे चीनमधील बहुतांश कंपन्या बंद असल्याने तेथून भारतात येणाऱ्या मालावर काहीकाळा करिता निर्बंध लागू होणार असल्याचे सांगण्यात आले. सद्यःस्थितीत चीनमधून सांगाडे आलेले नसून परिणामी “शिवाई’ धावू लागेल, अशी शक्‍यता नजीकच्या काळात तरी दिसत नाही. 

लॉकडाऊनमुळे चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले
पुणे विभाग शिवाईच्या ई-बसेसचे हब बनणार असून ई-बसेससाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा येथे उपलब्ध करण्यात येतील. शंकरशेठ रोडवरील एसटीच्या विभागीय मुख्यालयात ई-बसेस चार्ज करण्याकरिता 12 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील. पुण्याप्रमाणेच मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येतील. परंतु, या सर्व चार्जिंग स्टेशनचे काम करोनामुळे रखडल्याची माहिती देण्यात आली.

‘शिवाई’ची खास वैशिष्ट्ये…
– पर्यावरणपूरक व प्रदूषणविरहित वाहन
– लांबी 12 मीटर, रुंदी 2.6 मीटर, तर उंची 3.6 मीटर
– 322 किलोवॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटची बॅटरी
– आसन क्षमता 43, पुशबॅक स्वरूपाची आरामदायी आसने
– शिवाई वातानुकूलित असून 36 किलोवॅट क्षमतेची वातानुकूलित यंत्रणा
– एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 कि.मी. चा पल्ला गाठू शकेल
– चार्जिंगसाठी 3 ते 5 तास इतका वेळ लागेल
– 1 किलोवॅटमध्ये शिवाई बस किमान 1 ते 1.25 कि.मी. चालण्याची अपेक्षा
– इंजिन, गिअर बॉक्‍स, ट्रान्समिशन इत्यादी बाबींचा सामान खर्च तसेच देखभालीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही

राज्यभरात शिवाईच्या 50 गाड्या सुरुवातीच्या टप्प्यात धावणार असून त्याचे मार्गही तयार झाले आहेत. मात्र करोनामुळे शिवाईच्या धावण्याला सध्या ब्रेक लागला असून यंदाच्या वर्षी ती धावणार नाही. पुढील वर्षी मात्र शिवाई निश्‍चितच धावताना दिसणार असून प्रवाशांना पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद मिळेल.
-अभिजित भोसले, सहायक जनसंपर्क अधिकारी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.