पुणे – करोनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) “शिवाई’ ई-बस आता पुढील वर्षीच धावणार, अशी चिन्हे आहेत. या बसच्या बांधणीकरिता तब्बल 50 सांगाडे उपलब्ध होणार होते. तसेच, 100 नव्या बस एका खासगी कंपनीमार्फत उपलब्ध केल्या जाणार होत्या. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर बसचे सांगाडे उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनमुळे “शिवाई’ बस सुरू होण्यास पुढील वर्षी मे-जून महिना येणार असल्याचे एसटीच्या विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. “शिवाई’च्या ई-बसचे उद्घाटन गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात झाले होते. यावेळी, जानेवारीपासून बस संचलनात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर ही तारीख बदलत मार्चपासून “शिवाई’ धावू लागणार असल्याचे तत्कालीन परिवहन मंत्री यांनी सांगितले होते. त्यानंतर जूनची नवी तारीख देण्यात आली.
परंतु, आता करोनामुळे परदेशातील बहुतांश कंपन्या बंद असून तेथून भारतात येणाऱ्या मालावर काही काळाकरिता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे, एसटीचे काही भाग मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, शंकरशेठ रोडवरील एसटीच्या विभागीय मुख्यालयात ई-बसेसकरिता 12 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे निश्चित केले आहे. परंतु, या चार्जिंग स्टेशनचे काम लॉकडाऊनमुळे रखडले आहे. आता लॉकडाऊननंतर काम सुरू होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.