भोर- भोर तालुक्यातील हिर्डस मावळ खोऱ्यातील नीरा देवघर धरणाजवळ असलेल्या भांबटमाळ येथील पांडवकालीन प्राचीन श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिराची दुरवस्था झाली आहे. या मंदिराची दुरुस्ती करून मंदिराला पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, कृष्णाई जनसेवा संस्थेचे अध्यक्ष बाबाजी साळेकर यांनी नाराजी व्यक्त करून प्रशासनाकडून मंदिर परिसराचा कायापालट करण्याची मागणी केली आहे.
निगुडघर-रायरी रस्त्यावरील प्राचीन श्री नागेश्वराचे मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा भांबटमाळ येथील जंगम लोक करतात. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे. मात्र, मंदिर जीर्ण झाले असून कळसातून गळती होऊन गाभाऱ्यात पावसाचे पाणी जात आहे. मंदिराला संरक्षण भिंत नाही. आजूबाजूच्या निवाराशेडचीही पडझड झाली आहे. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असून, मंदिराबाहेर असलेल्या शिवलिंगाच्या पाच पिंडीही दुर्लक्षित झाल्या आहेत. परिसरातील शिवभक्त दर सोमवारी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन पुनर्विकास करण्यात यावा, अशी बाबाजी साळेकर यांनी मागणी केली आहे.
भोर तालुक्यात पर्यटनास वाव मिळेल, अशी अनेक ठिकाणे आहेत. भांबटमाळ येथील हे शिव मंदिरही त्याचाच एक भाग आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाने मंदिराचा पुनर्विकास केल्यास पर्यटनास वाव मिळेल. मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संग्राम थोपटे, खासदार सुप्रिया सुळे यांना ई-मेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.
बाबाजी साळेकर ,
अध्यक्ष, कृष्णाई जनसेवा संस्था