मुंबई – शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. नार्वेकर यांना 164 मते मिळाली आहेत. मात्र या निवडीपूर्वी नरहरी झिरवळ यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतोद यांचा व्हीप पटलावर दाखल करुन घेतला आहे. तर अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर शिंदे गटाच्या प्रतोदांचा व्हीप राहुल नार्वेकर यांनी पटलावर घेतला आहे.
त्यामुळे आता या दोन्ही शिवसेनेच्या व्हीपच्या प्रकरणात नेमक्या कोणत्या आमदारांच्या गटावर कारवाई होणार, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप धुडकावून लावल्याने, हे सरकार आणि त्यांचे सदस्यत्व किती दिवस राहील, अशी शंका अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या 16 आमदारांनी शिवसेनेच्या शिंदे गटाने काढलेला व्हीप नाकारल्याने, त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते, असे संकेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहेत.
तर अध्यक्षांनी बोलण्याची संधी शिवसेना प्रतोद म्हणून सुनील प्रभूंना दिली, भरत गोगावलेंना नाही, असा युक्तिवाद भास्कर जाधव यांनी केला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.