शिवसेनेच्या अडचणीत भर : आता संजय राऊतांवर महिलेचे आरोप; प्रकरण न्यायालयात

मुंबई – पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणामुळे जेरीस आलेला शिवसेना पक्ष आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत आता भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, त्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांच्यानंतर आता शिवसेनेची तौफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केले आहे. एवढंच नाही तर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात रीट दाखल करण्यात आली आहे.

मागील सात वर्षांपासून संजय राऊत यांच्याकडून आपला छळ सुरू असल्याचा आरोप महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली होती, हेरगिरी करणं, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणं, धमक्या देणे असे अनेक गंभीर आरोप महिलेने केले आहेत.

दरम्यान 2013 पासून आपला छळ सुरू आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये एकदा आपल्यावर गंभीर शारीरिक हल्ला करण्यात आला होता. त्याविषयी आपण मुंबई पोलिसांत तक्रार देखील केली होती. मात्र एफआयआर दाखल केल्यानंतरही मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप या महिलेने केला आहे. राऊत यांच्या राजकीय वजनामुळेच मुंबई पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी दोन रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावरील पहिली सुनावणी 4 मार्चला होणार आहे. ॲडव्होकेट आभा सिंह यांनी न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.