कसबा – महायुतीची ताकद मुक्ता टिळक यांच्या पाठीशी असून त्यांचा कसबा विधानसभा मतदारसंघातील विजय निश्चित असल्याची ग्वाही शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिली. तसेच, महिलांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच त्या सोडविण्यासाठी टिळक या सक्षम आमदार असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले वाडा ते कसबा गणपतीपर्यंत महिलांची प्रचारयात्रा काढण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. फुले वाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत ही फेरी सुरू करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा स्वरदा बापट, मतदारसंघाच्या अध्यक्षा वैशाली नाईक, शोभा गोखले, अश्विनी पांडे, योगिता गोगावले, क्रांती खांडरे, अश्विनी पवार, दीपाली मारटकर, अश्विनी शिंदे, नगरसेविका पल्लवी जावळे, गायत्री खडके, आरती कोंढरे, सुलोचना कोंढरे, अर्चना पाटील, मनीषा लडकत आदी उपस्थित होते.
गोऱ्हे म्हणाल्या, महायुतीची ताकद मुक्ता टिळक यांच्या पाठीशी आहे. या प्रचारफेरीत सहभागी झालेल्या महिलांची लक्षणीय संख्या पाहता हेच दिसून येते. स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी कार्यक्षम महिला आमदारांची आवश्यकता आहे. ती टिळक यांच्या रूपाने समोर येणार आहे. तर त्यांचा 20 वर्षांचा राजकीय प्रवास पाहता शहाराच्या समस्या, मतदारसंघाच्या समस्या सोडविण्यासाठी त्या कार्यक्षम आमदार म्हणून नक्कीच आपल्या कामाचा ठसा उमटवतील, असा विश्वासही गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
पुणेकरांचा आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कौल विकासकामालाच असून महायुतीची कामे सर्वसामान्यांना भावली आहेत. त्यामुळे आपल्याला मतदार संधी देतील असा विश्वास टिळक यांनी यावेळी व्यक्त केला.
टिळकच अधिकृत उमेदवार
मतदारसंघातून काही जणांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश डावलून महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. आपली चूक त्यांना निवडणुकीच्या निकालानंतर चांगलीच लक्षात राहील. त्यामुळे शिवसैनिक हे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशीच खंबीरपणे उभे राहतील आणि टिळक याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार असून मतदारांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही गोऱ्हे यांनी यावेळी केले.