NCB, BJP वर शिवसेनेची खोचक टीका,”आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील ३५०० किलो हेरॉईन प्रकरणात…”

मुंबई –  एनसीबीचा उलटलेला पंच प्रभाकर साईल याने त्याच्या व्हिडीओ मध्ये ज्या सॅम डिसोझाचे नाव घेतले आहे तो सॅम डिसोझा हा मुंबईतील मनि लॉड्रिंग प्रकरणातील मोठा प्लेअर असून तो अनेक राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांशीही संपर्कात असतो असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर आज या प्रकरणावर शिवसेनेच्या  अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे.   अदानी यांच्या मालकीच्या बंदरावर सापडलेल्या अमली पदार्थांपासून ते भाजपाने या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेपर्यंत अनेक विषयांना हात घालत शिवसेनेने हल्लाबोल केलाय.

काय आहे आजचा सामनाचा अग्रलेख

आपले पंतप्रधान लोकशाही मानतात, असे गृहमंत्री श्री. अमित शहा यांना सांगावे लागले. कारण हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का? हा प्रश्न संपूर्ण जगालाच पडला आहे. अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोजत आहोत हे श्री. शहा यांनीच मान्य केले.

त्यामुळेच सरकारला प्रश्न विचारणे गुन्हा ठरतो. सत्य बोलणे ओझे वाटते. सत्य बोलणाऱ्यांवर’धाडी’ घालायच्या व तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य!

तुला काय धाड भरली आहे?’ अशा एका गंमतीशीर वाक्प्रचाराचा अनुभव सध्या महाराष्ट्र राज्य घेत आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की धाडींचे? असा प्रश्न पडावा इतक्या विक्रमी धाडी केंद्रीय तपास यंत्रणांकडून पडताना दिसत आहेत. थापा मारणे हा दिल्लीतील राज्यकर्त्यांचा उद्योग होताच. आता ऊठसूट धाडी घालणे हा नवा व्यवसाय त्यास जोडून घेतला आहे. हा बिनभांडवली धंदा आहे. पैसा जनतेचा, यंत्रणा सरकारची व त्यातून विरोधकांचा काटा काढायचा असे हे व्यापारी डोके चालले आहे.

एकेकाळी मुंबईत कॉन्ट्रक्ट किलिंगचा जोर होता. भाडोत्री मारेकरी वापरून दुष्मनांचा काटा काढला जात असे. कॉन्ट्रक्ट किलिंगची जागा गव्हर्नमेंट किलिंगने घेतली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या दिल्लीत ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांच्यासाठी कॉन्ट्रक्ट किलिंगचे काम करताना दिसत आहेत. नको असलेले राजकीय विरोधक सरकारी यंत्रणांचा वापर करून खतम करायचे, हे सध्याचे धोरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने अमली पदार्थाच्या रॅकेटच्या नावाखाली अटक केली.

त्यावर श्री. मलिक तसेच राष्ट्रवादीची यथेच्छ बदनामी केली गेली. एनसीबीच्या ज्या अधिकाऱयांनी मलिक यांच्या जावयाला अटक केली, त्यांना भाजप कार्यालयात बोलावून ‘पद्मश्री’ देण्याचे बाकी होते. त्याच प्रकरणात मलिक यांच्या जावयास आता कोर्टाने जामीन दिला व जामिनाच्या आदेशात स्पष्ट सांगितले, मलिक यांच्या जावयाकडे सापडले ते अमली पदार्थ नव्हतेच. ते तर निव्वळ सुगंधी मिश्रित तंबाखू होते.

श्री. नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे आठ महिने तुरुंगात खितपत पडले. त्यांना जामीनही मिळू दिला नाही. मलिक यांची व त्यांच्या कुटुंबाची यथेच्छ बदनामी करण्यात आली ती वेगळीच. एनसीबी म्हणजे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे लोक मुंबईत पथारी पसरून बसले आहेत व अनेक खोटी प्रकरणे घडवून मनस्ताप देत आहेत. येथेही राजकीय विरोधकांना अडकवायचे काम चालले आहे. एनसीबीच्या अधिकाऱयांना जाब विचारण्याची हिंमत राज्यातील सत्ताधाऱयांनी दाखवायला हवी.

श्री. मलिक यांनी आता एक करावे, ज्यांनी हा बनाव रचला अशा हिरोगिरी करणाऱया अधिकाऱयांवर खटलेच दाखल करावेत. महाराष्ट्राची ही अशा प्रकारे यथेच्छ बदनामी केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने सुरू आहे. हा मजकूर लिहीत असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शोधण्यासाठी सीबीआयने म्हणे मुंबई-नागपुरातील त्यांच्या घरी धाडी घातल्या. ही देशमुखांवरील पाचवी धाड आहे. देशमुख यांना शोधण्याआधी सीबीआयने परमबीर सिंग यांना शोधायला हवे. कागदी आरोप करून परमबीर सिंग पळून गेले.

त्यांना शोधा. मुंबईचे पदभ्रष्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला व त्यानंतर सीबीआयपासून ईडीपर्यंत सगळेच राजकीय कर्तव्यभावनेने कामाला लागले, पण ज्यांनी आरोप केले ते पोलीस अधिकारी परमबीर सिंग कोठे आहेत? मुंबईतील एका खून प्रकरणात, खंडणीच्या अनेक गुन्हय़ांत ते पोलिसांना व केंद्रीय तपास यंत्रणांना हवे आहेत, पण परमबीर सिंग यांना शोधावे व सत्य जाणून घ्यावे असे केंद्राला वाटत नाही.

परमबीर सिंग हे आजही आय.पी.एस. म्हणजे भारतीय पोलीस सेवेत, केंद्राच्या सेवेत आहेत. ते परदेशात पळून गेले व आता हाती लागणार नाहीत असे सांगितले गेले. हे सत्य असेल तर ते केंद्रीय तपास यंत्रणांचे अपयश आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे आर्थिक गुन्हे करून परदेशात पळून गेले तेव्हा त्यांचा ठावठिकाणा ‘रॉ’ किंवा ‘सीबीआय’ने शोधून काढला. तसा ठावठिकाणा परमबीर सिंग यांच्या बाबतीतही शोधून काढा म्हणजे झाले!

पवारांवर धाडी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाने धाडी घातल्या व त्याचा मोठा गाजावाजा भाजपने केला. अजित पवार यांचे पुत्र पार्थ व श्री. पवार यांच्या राजकारणात नसलेल्या दोन बहिणींच्या घरात आयकर विभागाचे अधिकारी घुसले.

पवार यांच्या जवळच्या मित्रांवर धाडी पडल्या व चार-पाच दिवस हे धाडसत्र सुरूच राहिले. अजित पवारांच्या दोन्ही बहिणी राजकारणात नाहीत, पण पवारांचे नातेवाईक म्हणून त्यांच्या घरात केंद्रीय तपास यंत्रणांचे लोक घुसले.

घराचा ताबाच त्यांनी घेतला. जणू हे सर्व लोक गुन्हेगार आहेत अशा थाटात ते घुसले. एखाद्या सुसंस्कृत कुटुंबाच्या घरात ते शिरतात तेव्हा चांगल्या अधिकाऱयांवर दडपण येते व आपल्याकडून चूक होते असे त्यांच्या मनास वाटते, तेव्हा ते खजील होतात.

”आम्ही काय करणार? हे सर्व वरून आले आहे,” असे वर बोट करून ते त्यांचे कर्तव्य बजावतात. पुन्हा पवारांवर धाडी पडणार आहेत हे भाजपचे नेते आधीच जाहीर करतात तेव्हा यंत्रणांचा फोलपणा लक्षात येतो. भ्रष्टाचाराच्या खोटय़ा प्रकरणांचा देखावा उभा करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा खेळ चालला आहे.

अशा धाडी घालून त्रास द्यायचा व कोणाला तरी झुकवायचे हेच त्यामागचे धोरण आहे, पण महाराष्ट्र झुकणार नाही असे ठाकऱयांपासून पवारांपर्यंत सगळय़ांनीच जाहीर केले आहे. जो महाराष्ट्र दिल्लीतल्या औरंगजेबापुढे झुकला नाही व मोगलाईविरुद्ध लढत राहिला तो आज कोणापुढे झुकेल, हा प्रश्नच निर्माण होत नाही.

भयानक खेळखंडोबा

दिल्लीतील विद्यमान सरकारने देशातील लोकशाहीचा भयानक खेळखंडोबा केला आहे. या खेळखंडोब्यातून महाराष्ट्राची तरी सुटका व्हावी. भ्रष्टाचार नक्की करतोय कोण व धाडी कुणावर पडताहेत? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ‘पीएम केअर्स’ फंडाचा हिशेब कोणी द्यायला तयार नाही. या खात्यात पंतप्रधानांच्या नावावर हजारो कोटी रुपये कोणी जमा केले व ते पैसे देण्याच्या बदल्यात कोणाला काय मिळाले यावर शेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयातही चर्चा झाली. पीएम केअर्स फंड हा सरकारी नसून खासगी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे व सरकारातले अनेक ‘वाझे’ या पीएम केअर्स फंडात पैसे जमा करावेत म्हणून उद्योगपती, व्यापाऱयांना सूचना देत होते. ‘पँडोरा’ पेपर्स प्रकरण समोर आले. कर चुकविण्यासाठी देशातील श्रीमंत राजकारणी, उद्योजकांनी आपले धन परदेशात वळवले. त्यात भाजपसंबंधित अनेक बडे नेते सामील आहेत. या सगळय़ांवर मौन ठेवणारे महाराष्ट्रात शेतकऱयांना न्याय मिळावा यासाठी ‘बंद’ पुकारला म्हणून टीका करतात.

पीएम केअर्स फंड, ‘पँडोरा’ पेपर्ससंदर्भातील किती उद्योगपतींवर आता धाडी पडल्या हे सर्व आता गटार फुटल्याप्रमाणे बाहेर पडेल. मोरीला आता बूच लावता येणार नाही. याचे कारण असे की, भ्रष्टाचाराचा अमर्याद विजय होण्याइतके पाप या भारतभूमीवर अजून एकत्र झालेले नाही.

सत्याचे व पुण्याचे माप रिकामे पडलेले नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यायालयातही ‘आपली’ माणसे घुसविण्याचा प्रयत्न सुरू असला तरी या देशातील हायकोर्टात आजही सत्य पूर्ण मेलेले नाही व सुप्रीम कोर्ट बरखास्त झालेले नाही हे लोकशाहीचा गळा घोटणाऱयांनी विसरू नये.

भ्रष्टाचाराचे जनक कोण?

मुंबईतल्या समुद्रात एका ‘क्रुझ’वर एनसीबीने धाडी घातल्या. शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह इतर तरुण मुलांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. ही संपूर्ण ‘रेड’ कशी बोगस होती याचे वस्त्रहरण श्री. नवाब मलिक यांनी चित्रफितीच्या पुराव्यासह केले. भारतीय जनता पक्षासंदर्भात इतर दोघांची मुले त्याच पार्टीत होती. त्यांना बोटीवरून सहीसलामत बाहेर काढले. छापा टाकण्यासाठी व संशयितांना पकडण्यासाठी संशयास्पद गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक (भाजपसंबंधित) कसे सामील झाले होते ते सर्व या प्रकरणात ‘एक्सपोज’ झाले. ईडी आणि सीबीआयने कोणावर कारवाई करावी हे भाजपचे पुढारी सांगतात व कारवाई करण्याच्या तारखा देतात.

जित पवारांवर धाडी पडणार हे भाजपचे नेते चार दिवसांपूर्वी सांगत होते. श्री. किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची प्रकरणे समोर आणतात. जणू त्यांच्या पक्षातले लोक फक्त चिंचोके खाऊन जगतात. पीएम केअर्स फंडापासून सध्याच्या कोळसा टंचाईपर्यंत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे अस्वस्थ करणारी आहेत. 

या प्रकरणांचा तपास कधी होणार? भाजपच्या एका ‘आयात’ पुढाऱयाच्या कुटुंबाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतले 500-700 कोटीचे आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उघड झाले. शिवसेनेच्या सौ. सुलभा उबाळे यांनी त्याबाबतचे पुरावे समोर आणले. हे सर्व पुरावे मी भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे नवे ‘अण्णा’ किरीट सोमय्या यांना पाठवत आहे. 

त्यांनी ते ईडीकडे सुपूर्द करावेत. या भ्रष्टाचारावरही हल्ला करावा हीच अपेक्षा! भ्रष्टाचारास शंभर तोंडे व हजार हात असतात. त्यात तुमची तोंडे व हात किती तेसुद्धा कळू द्या. देशात सध्या जे धाडसत्र चालवले जात आहे ते विरोधकांवर दहशत निर्मांण करण्यासाठीच. नातेवाईकांनाही सोडत नाहीत.

 नेत्यांच्या आई व बहीण यांनाही अडकवले जाते. अडाण्यांच्या हाती लोकशाहीची दोरी आली की, त्याचा फासाचा दोर होतो व त्या फासाचेही समर्थन नादानपणे केले जाते. देशाचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी एक तजेलदार वक्तव्य नुकतेच केले. श्री. शहा म्हणतात, ”मोदी हे लोकशाहीवर विश्वास असलेले नेते आहेत.”

 श्री. शहा पुढे काय म्हणतात ते पहा, ”अशिक्षित व्यक्ती हे देशावरचे ओझे आहे. हे ओझे कसे, तर त्या अशिक्षित व्यक्तीला संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती नसते व देशाप्रति असलेल्या कर्तव्याचीही जाणीव नसते. अशा अशिक्षित व्यक्तीस देशाचे चांगले नागरिक तरी कसे म्हणावे? ते देशावरचे ओझेच असते!”

आश्चर्य काय असते ते पहा. स्वतंत्र आणि लोकशाहीप्रधान देशात सांगावे लागते की, ”जन हो, आपले पंतप्रधान लोकशाहीवादी आहेत.” हे सांगण्याची गरज का भासली?
पारतंत्र्यात देशातील माणसाचा स्वाभिमान गुन्हा ठरत होता, पण स्वतंत्र देशातही स्वाभिमान व सत्य बोलणे हा गुन्हा ठरत असेल तर स्वातंत्र्याला ‘धाड’ भरलीय असे म्हणायला हवे.
सर्वत्र धाडांचाच धुरळा उडालाय. त्यात स्वातंत्र्य गुदमरून पडले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.