कोल्हापूर, हातकणंगलेवर शिवसेनेचा भगवा

धनंजय महाडिक, राजू शेट्टी यांना पराभवाचा धक्‍का

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कोल्हापूरच्या जागेवर भगवा फडकवा, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न या निवडणुकीत साकार झाले आहे. कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करून शिवसेनेचे संजय मंडलिक हे अडीच लाखापेक्षा अधिक विजयी झाले तर हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले राजू शेट्टी यांचा पराभव करत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे जवळपास एक लाख मताधिक्‍य घेत विजयी झाले. या दोघांच्या विजयामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरती भगवा फडकला आहे.

कोल्हापुरात मंडलिक विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक, तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध खासदार राजू शेट्टी यांच्यात लढत झाली. धैर्यशील माने हे पहिल्याच प्रयत्नात शेट्टी यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केला. मंडलिक यांनी गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.

कोल्हापुरात गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापूरची रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदामात, तर हातकणंगलेची मतमोजणी राजाराम तलावाशेजारील गोदामात सुरू झाली. सुरुवातीच्या टपाली मतांमध्ये कोल्हापुरातून शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे धैर्यशील माने यांना मताधिक्‍य मिळाले. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यावर पहिल्या फेरीपासूनच संजय मंडलिक यांनी आघाडी घेतली.

धैर्यशील माने यांनाही पहिल्या फेरीपासूनच लीड मताधिक्‍य मिळाले. त्यांचे मताधिक्‍य तुलनेत कमी होते. पहिल्या फेरीत तर ते शेकड्यांत होते; त्यामुळे त्या मतदारसंघात चुरस होणार, असे वातावरण होते; परंतु दुसऱ्या फेरीपासून हे मताधिक्‍य वाढत गेले व कोणत्याच फेरीत शेट्टी यांना मताधिक्‍य मिळाले नाही. इचलकरंजी, हातकणंगले व शाहूवाडी या मतदारसंघांनी माने यांना भरघोस मते दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.