मुंबई – वरळी विधानसभेचे शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांना शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुनील शिंदे यांनी वरळीची जागा सोडली होती. आता विधानसभा सदस्य एक जागा रिकामी होत आहे. यामुळे शिवसेनेकडून शिंदे यांचं विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात येणार आहे. मात्र रामदास कदम यांना डच्चू देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती.
सुनील शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत सेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.
सुनील शिंदे हे 2007मध्ये ते मुंबई महापालिकेत निवडून आले होते. बेस्ट समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. 2014 मध्ये सचिन अहिर यांचा पराभव करुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते.