चुकीच्या कामांना थारा नको; खासदार संजय राऊत यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
पुणे – महापालिकेत चुकीच्या कामांना थारा देऊ नका, त्यावर वेळीच आवाज उठवा. शहराचा विकास आणि नागरिकांच्या हिताची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा. पक्षाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहचावा, अशा सूचना खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गटनेते आणि पदाधिकऱ्यांना दिल्या.
शहरातील पक्षबांधणी आणि संघटनात्मक काम करावे अशी सूचना करत सद्यस्थितीत पुण्यात शिवसेनेचे दहा नगरसेवक असून आगामी निवडणुकीत ही संख्या पन्नास पाहिजे, असेही राऊत म्हणाले. शनिवारी (दि. 21) एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने खासदार राऊत हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी डेक्कन येथील शिवसेना भवनामध्ये पदाधिकारी आणि नगरसेवक यांची बैठक घेऊन, शहर सेनेच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला.
राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर शिवसेनेने आता मुंबईपाठोपाठ पुणे महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, आता शहर आणि जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या आढावा बैठकीत प्रभागरचनेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय गणितं मांडताना शिवसेनेची ताकद कशी वाढेल, पक्षबांधणी कशी होईल याकडे शिवसैनिकांनी लक्ष दिले पाहिजे. पूर्वीच्या युतीमुळे शिवसेनेला पुण्यात उमेदवारी मिळाली नाही. गेल्या काही वर्षांत पालिकेतील शिवसेनेचा आलेख सातत्याने घसरत गेला आहे. पक्ष नेतृत्त्वानेही पुण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.