पोटनिवडणुकीत आघाडी होण्याचे संकेत; राठोड, सातपुते यांना टाळून आघाडीसाठी प्रयत्न
नगर – राज्यात सत्तेसाठी नव्याने अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीचा प्रयत्न आता नगर शहरात सुरू झाला आहे. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना टाळून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी आज आमदार संग्राम जगताप यांची भेट घेवून महाविकास आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिकवर ही आघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरगावकर यांनी आ. जगताप यांना आघाडीचा प्रस्ताव दिला असून पक्षाच्या वरिष्ठांबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आ. जगताप यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेसाठी झाली असून राज्यातही या आघाडीचा प्रयोग सर्वत्र राबविण्याचे धोरण या महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने घेतले आहे. नगर महापालिकेत महाविकास आघाडी होण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे चित्र होते. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व आ. संग्राम जगताप यांच्यात महापालिका निवडणुकीपूर्वीपासून आलेली कटुता पाहता शहरात महाविकास आघाडी होण्याची शक्यता नाही.
परंतु आता भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यभर हा महाविकास आघाडीचे धोरण स्वीकारण्यात आले असताना नगरमध्ये मात्र ते स्वीकारले जात नसल्याने आता राज्यपातळीवर त्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कोरगावकर यांनी आज आ. जगताप यांची भेट घेवून पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा प्रस्ताव ठेवला. ही भेट घेत असतांना कोरगावकर यांनी राठोड व सातपुते यांना बाजूला ठेवले. त्यांना टाळून शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह ही भेट घेण्यात आली. प्रभाग 6 मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने माघार घेतली आहे.
त्यामुळे शिवसेना व भाजप अशी सरळ लढत होत आहे. अशावेळी महाविकास आघाडी झाली तर शिवसेनेच्या उमेदवाराला त्याचा फायदा मिळणार असून भाजपचा पराभव करणे सोपे होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न होत आहे. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर, शहरजिल्हाध्यक्ष माणिक विधाते, गणेश भोसले, अविनाश घुले, रेश्मा आठरे, विनित पाऊलबुद्धे, शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे, अनिल शिंदे, शाम नळकांडे, गणेश कवडे, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.