इतर पक्ष, संस्थांनाही मदतीचे आवाहन
रांजणगाव गणपती – वाघाळे (ता. शिरूर) येथे कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. शिवसेनेप्रमाणे इतरही राजकीय पक्षांनी व सामाजिक संस्थांनी मदत करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते सुरेश थोरात यांनी केले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी वाघाळे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी भिवाजी बबन शेळके यांच्या कुटुंबाला भेट देऊन 25000 रुपये रकमेचा धनादेश दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत थोरात, शिवसेना उपतालुका प्रमुख आनंदराव हजारे, कारेगावचे सरपंच अनिल नवले, वाघाळे गावचे सरपंच अमोल धरणे, माजी सरपंच तुकाराम भोसले, किसन गोरडे, आबासाहेब थोरात, जयेंद्र सोनवणे, योगेश शेळके, गणेश शेळके, नितीन शेळके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाघाळे ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके यांचे आभार मानले.