मुंबई : राज्यात आज शिवसेनेसाठी मोठा धक्का देणारा दिवस ठरला आहे. कारण वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दसम्यान, या घटनेवर भाजपा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
“शिंदे गट बरेचसे धक्के शिवसेनेला देत आहे, आता मला काळजी एवढीच आहे की या धक्क्यांमधून उद्धव ठाकरेंची शिवसेना किती स्वत:ला सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. पण शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे.” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
यासोबतच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. यावरही नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्याकडे काही पुरावे नाहीत, मी काय त्याल दुजोरा देणार नाही. तुम्हाला दुजोरा दिला आणि परत कोर्ट-कचऱ्या हे सर्व नको. ते साक्षीदार असतील त्यांना माहीत असेल, खोके किती प्रमाणावर जात होते. मातोश्रीला खोके आणि शिवसैनिकाला काही नाही. पिशव्या खाली पिशव्या. म्हणूनच हे ४० जण बाहेर पडले.” असे नारायण राणे म्हणाले आहेत.