मसुद अझर प्रकरणावरून शिवसेनेची कॉंग्रेसवर टीका

मुंबई: संयुक्तराष्ट्रांनी मसुद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करून त्याच्यावर जे प्रतिबंध लागू केले आहेत त्याच्या टायमिंगवरून टिका करणाऱ्या कॉंग्रेसवर शिवसेनेने आपल्या मुखपत्रावरून निशाणा साधला आहे. दहशतवादाच्या विरोधातील कारवाईसाठी कोणतेही विशिष्ट टायमिंग ठरवता येत नाही असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेने आपल्या मुखपत्रात म्हटले आहे की पाकिस्तानात दहशतवाद निर्माण करण्याची फॅक्‍टरी चालवली जात असून मसूद अझर हा त्या फॅक्‍टरीचा संचालक आहे. तो भारताचा एक नंबरचा शत्रु आहे. तो केवळ काश्‍मीरमधील दहशतवादाला कारणीभूत नाही तर मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याचाही तो सूत्रधार आहे. भारताचे तुकडे करणे हे त्याचे स्वप्न आहे.

पुलवामाच्या हल्ल्यालाही हाच सैतान जबाबदार होता. त्यामुळे त्याच्यावर संयुक्तराष्ट्रांकडून घालण्यात आलेली बंदी समर्थनीयच ठरते. तथापी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणातून घडवण्यात आले असल्याचा कॉंग्रेसने केलेला आरोप बेजबाबदारपणाचा आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. हा भारताचा मोठा लाभ असून सुद्धा कॉंग्रेसने त्यावर प्रश्‍न चिन्ह उपस्थित करणे हे दुर्देवी आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

या कृतीच्या टायमिंग विषयी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रश्‍न उपस्थित करण्यापर्यंत मजल मारली आहे. याचा मोदींना निवडणुकीत लाभ होईल अशी भीती त्यांना वाटत असावी अशी टिपण्णीही यात करण्यात आली आहे. पण या टायमिंग विषयी कमलनाथ यांनी संयुक्तराष्ट्रांनाच विचारवे असा सल्लाही त्यांना यात देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.