अग्रलेख : शिवसेनेचे संपर्क अभियान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व प्रमुख शिवसैनिकांसमोर बोलताना शिवसेनेची आगामी काळातील भूमिका कशी असेल, याबाबत काही घोषणा केल्या. येत्या आठवड्यात म्हणजेच 23 ते 28 फेब्रुवारीदरम्यान राज्यात सर्वत्र शिवसेनेचे “शिव संपर्क अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणाही या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केली. त्याच कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर “राम का नाम बदनाम ना करो’ या शब्दांत टीका केली.

अयोध्या येथे बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित राममंदिराच्या बांधकामासाठी भाजपाचे सध्या घरोघरी जाऊन निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे. यावर टीका करण्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशात सर्वत्र घरोघरी जाऊन राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी गोळा करण्याच्या निमित्ताने भाजपा आपला संपर्क वाढवत आहे, ही गोष्ट लक्षात आल्यानेच बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी या अभियानाला विरोध केला आहे. त्याच धर्तीवर उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे आणि भाजपचा या संपर्क अभियानाचा परिणाम कमी करण्याचा एक भाग म्हणूनच बहुधा शिवसेनेने येत्या 23 तारखेपासून संपर्क अभियानाची घोषणा केली असावी. 

राज्यात सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आणि या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत असले तरी सर्वच पक्ष आपापल्या पातळीवर आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्याचे काम करत आहेत, ही बाब कोठेही लपून राहिलेली नाही. कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेत नुकतेच करण्यात आलेले बदल पाहता कॉंग्रेसलाही महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा प्रभाव पुन्हा वाढवायचा आहे, हेच स्पष्ट होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर कायम संपर्क अभियान सुरू असते. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेने आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी संपर्क अभियान सुरू केले, त्यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. फक्‍त राज्यात लवकरच होणाऱ्या विविध महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे शिव संपर्क अभियान सुरू होत आहे. 

मुंबईसारख्या सर्वात मोठ्या महानगरपालिकेमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवतील अशी कोणतीही शक्‍यता आता दिसत नसल्याने शिवसेनेलाही मुंबई महापालिकेच्या सत्तेत इतर कोणालाही वाटा देण्याची इच्छा नसल्याने महापालिकेतील आपला प्रभाव कायम ठेवण्याच्या उद्देशाने शिवसेनेने हे संपर्क अभियान नियोजित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुदा पक्षीय पातळीवर न लढवता स्थानिक आघाड्यांच्या पातळीवर लढवल्या जात असल्याने या आघाड्यांच्या मागे जो राजकीय पक्षांचा चेहरा असतो तो प्रभावी असेल तर त्या राजकीय आघाड्यांना निवडणुकीत यश मिळू शकते, ही गोष्ट लक्षात आल्यानेच शिवसेनेने राज्यात सर्वत्रच आपला संपर्क वाढवण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेना जेव्हा सत्तेत नव्हती किंवा भाजपसोबत सत्तेत होती तेव्हा विविध प्रकारची आंदोलने करून शिवसेना चर्चेत राहात असे. सध्या महाराष्ट्रात शिवसेना सत्तेवर असल्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही आंदोलन करून

चर्चेत राहण्याची शक्‍यता नसल्यानेच सेनेला आता या संपर्क अभियानाचा आश्रय घ्यावा लागला आहे. भाजपबरोबर 25 वर्षे युती केल्यानंतर या युतीतून भाजपाचाच जास्त फायदा झाल्याचे शिवसेनेच्या लक्षात आल्यानेच आता महाविकास आघाडी जरी स्थापन झाली असली तरी त्याचा कोणताही परिणाम शिवसेनेच्या पक्ष वाढीवर होणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे घेत आहेत, हेच यातून स्पष्ट होते. मुळातच शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना नेत्यांच्या एका हाकेवर हजारो शिवसैनिक धावून येतात, असा आजवरचा इतिहास आहे. सध्या सत्तास्थानांवर असताना शिवसैनिकांची ही लढाऊवृत्ती कमजोर होऊ नये आणि त्याचा परिणाम पक्ष वाढीवर होऊ नये याच हेतूने उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक संपर्क अभियानाचे नियोजन केले असावे, असे असले तरी एक प्रकारे भाजपच्या राम मंदिराच्या अभियानाच्या निमित्ताने वाढत असलेल्या संपर्क अभियानाला उत्तर म्हणून शिवसेनेने हे संपर्क अभियान सुरू केले असले तरी त्यातून अप्रत्यक्षपणे त्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या मित्र पक्षांनाही इशारा दिला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार आणि प्रभाव वाढवण्याचा अधिकार असतो.

राजकारणात सत्ता स्थापन करण्यासाठी इतर राजकीय पक्षांसोबत मैत्री करण्यात आली असली तरी त्या मैत्रीचा पक्ष वाढीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता सर्वच घटक पक्ष घेत असतात. कॉंग्रेसबरोबर दीर्घकाळ सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने ज्याप्रकारे महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवला ते उदाहरण उद्धव ठाकरे यांच्यासमोर असल्यानेच त्यांना आता सरकार चालवत असतानाच शिवसेनेचा विस्तार वाढवण्याकडेही लक्ष द्यावे लागत आहे. स्वबळावर सत्ता आणणे हे सर्वच राजकीय पक्षांचे ध्येय असल्याने जेव्हा-केव्हा राजकारणात अशा प्रकारे स्वबळ दाखवण्याची वेळ येईल तेव्हा आपला पक्ष कोणत्याही प्रकारे गाफील नसेल आणि कोणत्याही राजकीय कामगिरीसाठी तयार असेल हेच उद्धव ठाकरे यांना या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे. याशिवाय संपर्क अभियानाच्या निमित्ताने इतर राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणण्याचे कामही केले जाईल. या वर्षभराच्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या सरकारने केलेल्या विविध कामांची माहितीही या निमित्ताने लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

खरे तर आतापर्यंत शिवसेनेने अशा प्रकारचे कोणतेही अभियान राबवले नव्हते. गावागावांत शिवसेनेच्या शाखा असल्याने आणि शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावर राबता असल्याने आपोआपच शिवसेनेची चर्चा होत असे. आता भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पक्षांचा संपर्क वाढविण्यासाठी विविध योजनांची घोषणा केल्याने शिवसेनेलाही गप्प राहणे शक्‍य नव्हते. साहजिकच शिवसेनेचे एक पक्ष आणि एक सत्ताधारी पक्ष म्हणून काम या दोन्ही प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेच्या संपर्क अभियानाला इतर राजकीय पक्ष कशा प्रकारे प्रतिसाद देतात आणि कोणती व्यूहरचना आखतात हेही पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.