शिवसेनेची 56 इंच छाती बुधवारपर्यंतच

अमित शहा सेनेला जागा दाखवून देण्याची शक्‍यता; समान वाटा सोडा फार काही देणार नसल्याचे संकेत

मुंबई : उध्दव ठाकरे यांच्या हातात महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कंट्रोल, ताकद वाढली, राज्यात शिवसेनाच महत्वाची अशा स्वरूपाचे मथळे गेले काही दिवस सामनामध्ये झळकत आहेत. राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला शिवसेना नेते दिवाकर रावते आणि मुख्यमंत्री दिवाकर रावते स्वतंत्रपणे भेटले. या साऱ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर भाजप सेनेतील सत्ता संघर्ष लपून राहिला नाही. या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे चाणक्‍य अमित शहा हे उध्दव ठाकरे यांची बुधवारी (दि. 30) भेट घेणार आहेत. त्यावेळी शिवसेना नमते घेणार की शहांच्या बोलण्याला मान देणार याबाबत औत्सुक्‍य आहे.

प्रस्ताव 1 : मुख्यमंत्री पद अडीच वर्ष दोन्ही पक्षाला मिळावे
शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचे वचन स्व. बाळासाहेबांना दिले होते, असे उध्दव ठाकरे निवडणूक प्रचारात अनेकदा म्हणाले होते. उपमुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरे यांना दिले जाणार असे बोलले जात होते. मात्र निकालानंतर नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नव्या सरकारमध्ये आदित्य यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा आग्रह धरण्यात आला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास तयार आहे. मात्र मुख्यमंत्रीपद देण्यास कोणत्याही स्थितीत तयार नाही. अर्थात हा फॉर्म्युला कधीच यशस्वी ठरलेला नाही, हे मायावती-कल्याणसिंग उत्तर प्रदेशमध्ये, मुफ्ती सईद आणि गुलाम नबी आझाद काश्‍मीरमध्ये आणि कुमारस्वामी आणि येडीयुरप्पा यांच्यात कर्नाटकात सिध्द झाले आहे.

भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे स्थान पक्के झाले आहे. मुख्यमंत्री पद वाटून घेण्याने शिवसेना भाजपाएवढीच प्रबळ असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न आहे. तसेच फडणवीस यांना पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हा प्रस्ताव शिवसेनेकडून पुढे आणला जात आहे. जो भाजपा मान्य करण्याची सुतराम शक्‍यता नाही.

प्रस्ताव 2 : मंत्रीमंडळात अधिक स्थान
फडणवीस यांच्या गेल्यावेळेच्या मंत्रीमंडळात 22 जण होते. त्यात भाजपचे 16 तर शिवसेनेचे पाच मंत्री होते. त्यामुळे शिवसेनेच्या अधिक आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळावी आणि काही चांगली अर्थपूर्ण खाती मिळावी, अशी मागणी होती. भाजपा सार्वजनिक बांधकाम, महसूल, कायदा आणि न्याय, आणि वनमंत्रालय ही खाती देण्यास भाजपाची तयारी आहे. त्यापेक्षा अधिक काहीही देण्यास भाजपा तयार नाही. शिवसेनेला अधिक खाती देणे म्हणजे भाजपातील काही जेष्ठ नेत्यांना अस्वस्थ करण्यासारखे आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावरील पक्षांतर्गत नाराजी आणि दबाव वाढू शकतो. त्यामुळे हा फेस्तावही बासनात गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे.

सेनेची वाटाघाटींची ताकद खरंच वाढली का?
या प्रश्‍नाचे उत्तर सेनेच्या दृष्टीने होय असेच आहे. मात्र राष्ट्रवादीच्या बाजूचा विचार केल्यास काय दिसते? गेल्या चार दिवसांत शरद पावार यांनी शिवसेनेसोबत हातमिळवणी करण्याच्या अफवांचे सातत्याने खंडन केले आहे. बारामतीत तर त्यांनी स्पष्ट केले की जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही ती भूमिका पार पाडणार आहोत. या खुलाशानंतर शिवसेनेला भजपासोबत जाण्यावाचून पर्याय राहिला नाही. पवार यांनी भाजपा सरकारला 2014 मध्ये पाठींबा देऊन असाच शिवसेनेला दणका दिला होता. त्यानंतर सेना सत्तेसाठीच युतीत आहे, या अरोपाला त्यामुळे बळ मिळाले होते.

चाणक्‍य शहा काय करणार?
भाजप सेनेतील सुंदोपसूंदीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे चाणक्‍य अमित शहा बुधवारी (दि. 30) मुंबईत येत आहेत. ते शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देतील, अशी भाजपाची आशा आहे. त्यानंतरच पक्षाच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. तोपर्यंतच शिवसेना 56 आमदारांच्या जीवावर 56 इंच छाती दाखवू शकेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.