मुंबई – राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेचे दोन गट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर उद्धव ठाकरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशा दोन्ही शिवसेनेच्या वतीने यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. या आधी देखील दसऱ्याला दोन दसरा मेळावे राज्याला पाहायला मिळाले होते.
19 जून हा दिवस शिवसेनेचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्धव ठाकरे यांनी यंदाचा वर्धापन दिन हा आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही गट वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहे.
गेल्या वर्षी झालेला दसरा मेळावा देखील दोन ठिकाणी झाला होता. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला होता. त्याचप्रमाणे यंदा शिवसेनेचा वर्धापन दिन देखील दोन ठिकाणी पार पडणार आहे. मात्र त्यासाठीचे ठिकाणे अद्याप ठरलेली नाहीत.
अध्यक्षांच्या निकालाकडे लक्ष
राज्यातील सत्ता संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता सर्वांचेच लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लागले आहे. 16 आमदारांना अपात्र ठेवण्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांना घ्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्यास नकार देत हा निर्णय त्यांच्याकडे सोपवला होता. त्यासाठी नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांची मुळ घटना मागविल्याची माहिती आहे.