सिंधुदुर्ग – शिवसेनेतून कॉंग्रेस ते भाजप असा प्रवास करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या भाजपाचा झेंडा हातात घेतलेले नारायण राणे शिवसेनेवर वार करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही त्यांनी शिवसेनेवर घणाघाती हल्ला करून पुढील विधासभा निवडणुकीत शिवसेनाला कोंकणातून हद्दपार करण्याची गर्जना केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अकराही आमदार कोंकणातून निवडून येणार नाहीत, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री हे शिवसेनेचे 145 आमदार घेऊन मुख्यमंत्री झालेले नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शिवसेनेचे 11 आमदार कोंकणातून निवडून आलेले आहेत. हे आमदार कोंकणात फिरकतही नसल्याचे तसेच कोंकणाच्या विकासावर बोलत नसल्याची टीका राणे यांनी केली.
सध्या शिवसेनेचे 56 आमदार आहेत. त्यापैकी 11 आमदार हे कोंकणातून निवडून आले आहेत. या अकराही आमदारांना पुढील विधानसभा निवडणुकीत घरी बसवणार असल्याचे राणे म्हणाले.