मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्यांच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली.
अहिर हे पक्षात त्यांच्या तरूणपणापासून कार्यरत होते. अल्पकाळातच ते विधानसभा त्यापुढे मंत्री व विविध जबाबदाऱ्या पवारसाहेबांनी त्यांना दिल्या. त्यांच्या मतदारसंघात अनेक अडचणी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
अहिर यांच्या जाण्याने पक्षात दुख असले तरी संकटात व लढाईच्या वेळी जो बरोबर राहतो त्याचाच कस लागतो, अशा शब्दात पाटील यांनी चिमटा देखील काढला. याप्रसंगी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून सर्व मार्गांचा अवलंब होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील सरकारदेखील वेगवेगळ्या आमदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबईतील सर्व पदाधिकारी बळी पडले नाहीत, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.