महाराष्ट्र संपन्न, समृद्ध बनवण्याचा शिवसेनेचा ध्यास

प्रा. नितीन बानुगडे; शेखर गोरेंच्या प्रचारासाठी मुंबईत मेळावा

गोंदवले – ही विधानसभा निवडणूक शिवसेना एक विचार घेऊन लढवत आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त, कर्जमुक्‍त, बेरोजगारीमुक्‍त, गुन्हेगारीमुक्‍त करायचाय. महाराष्ट्र संपन्न व समृद्ध बनवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे. माण-खटावमधून शेखर गोरेंना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देऊन याची सुरुवात करावी. शेखर गोरे आमदार म्हणून विधिमंडळात दाखल होतील तो दिवस माण-खटावच्या परिवर्तनाचा व संपन्नतेचा पहिला दिवस असेल.

माण-खटावमध्ये त्यांनी केलेले कार्य संपूर्ण राज्यात कोणीही केले नाही. त्यामुळे कोणाचे काहीही ठरले तरी येथील जनतेने शेखर गोरेंनाच आमदार करण्याचे ठरवले आहे, असा विश्‍वास शिवसेना उपनेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्‍त केला.

माण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचारार्थ मुंबई येथील माण-खटाव रहिवासी संघाच्या वतीने कळंबोली येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेचे माण-खटाव संपर्कप्रमुख शंकर वीरकर, रंग कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजीराव सावंत, युवा उद्योजक संदीप घोरपडे, शिवसेना वाहतूक सेनाप्रमुख संभाजी जगताप, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार, रामदास शेवाळे, राहुल कोळी, राजेंद्र जाधव, रमेश डुबल, उद्योगपती किरण जाधव आदी उपस्थित होते.

प्रा. बानुगडे म्हणाले, “”शेखर गोरेंनी खांद्यावर घेतलेला भगवा माण-खटावमध्ये फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे. माण-खटाव या दुष्काळी भागातील शेकडो कुटुंबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई व उपनगरांमध्ये यावे लागतेय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतल्या कृष्णा खोऱ्यातील सिंचन योजना आघाडीच्या काळात रखडल्या; पण या योजना आपल्याच काळात पूर्ण होऊन त्यांचे उद्‌घाटन करण्याचे भाग्य आपल्यालाच लाभणार असून त्याचे नारळ आमदार म्हणून शेखर गोरे फोडतील.”
शेखर गोरे म्हणाले, “”हक्‍काचं पाणी कायमस्वरूपी पाहिजे. तरुणांना रोजगार पाहिजे. माझ्या मतदारसंघातील जनतेला त्याच मातीत रोजगार मिळाला असता, तर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत यायची गरज पडली नसती. या स्वार्थी राज्यकर्त्यांनी या भोळ्याभाबड्या जनतेचा वापर फक्‍त मतांसाठी करून घेतला.

माजी लोकप्रतिनिधी दहा वर्षांत कायमस्वरूपी पाणी आणू शकला नाही. जलनायक म्हणून मिरवता, तर 81 गावांत पाण्याचे टॅंकर का लागतात याचे उत्तर द्या. महिला सक्षमीकरण, शैक्षणिक सुविधा, मोठे हॉस्पिटल उभारायचे आहे. त्यासाठी मला एक संधी द्या.” शंकर वीरकर, धनाजी सावंत, संदीप घोरपडे यांनही आपल्या भाषणात शेखर गोरेंना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी मुंबईकरांनीही “आमचा एकच निर्धार, यंदा शेखरभाऊंना आमदार करणार’, अशा घोषणा दिल्या. शेखरभाऊंची क्रेझ मुंबईवासीयांमध्येही पाहायला मिळाली. मेळाव्यानंतर शेखरभाऊंच्या भोवती युवा वर्गासह नागरिकांनी दोन तास गराडा घालून सेल्फी काढल्या.

अरं, कडकनाथ आधी तुझं बघ…
सदाभाऊ आता कडकनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. लोकसभेला उभे राहिल्यावर त्यांना माण-खटावच्या जनतेने मत दिली; पण हे बहाद्दर नंतर तिकडं फिरकलेच नाहीत आणि आता म्हणताहेत की, आपल्या जयाभाऊंना निवडून द्या. अरे, जयाभाऊंना तुमच्या घरी घेऊन जा. परवा म्हसवडला म्हणे मुख्यमंत्र्यांपेक्षा तुमच्यासाठीच जास्त बंदोबस्त होता. तुम्हाला राज्यात फिरायची सोय राहिली नाही.

पहाटे कोंबडं आरवलं तरी हे लगेच जाग होतात. कोणी कोंबड्या फेकतायत की काय म्हणून. अन्‌ तुम्ही आमची मापे काढताय. माजी लोकप्रतिनिधी, कडकनाथ व खासदार यांची टोळी आहे. ही टोळी माण-खटावला लुटायला आलीय; पण घाबरू नका त्यांचा बंदोबस्त करायला मी खंबीर आहे. परिवर्तनासाठी मला एक संधी द्या, असे आवाहन शेखर गोरे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.