शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करु नये; मुख्यमंत्री पदासाठी आठवलेंचा नवा फॉर्मुला

मुंबई: भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यात महाशिवआघाडी ची सत्ता अस्थित्वात येण्याच्या जोरदार हालचाली सुरु असताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता महायुतीत सरकार येण्याच्या आशा मावळल्या असताना देखील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले अजूनही प्रचंड आशावादी आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाऊ नये, असं आवाहन करत त्यांनी भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रिपद वाटपाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे.

आठवले म्हणाले की, भाजप प्रमाणेच शिवसेना देखील हिंदुत्ववादी विचारधारेचा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणं योग्य ठरणार नाही. शिवसेनेने महाशिवआघाडीच अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा त्यांनी भाजपासोबतच राहायाला हवे.

तसेच मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने देखील पुढाकार घेत साडेतीन वर्षं भाजपाचा मुख्यमंत्री आणि दीड वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री, असं वाटप करून दोघांनी आपापसातील वाद मिटवावा, असं आठवलेंचं म्हणणं आहे. शिवसेनेचे जे आमदार निवडून आलेत ते महायुतीमुळे आलेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढून निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेनं मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी आग्रही सूचना देखील आठवले यांनी केली आहे.

शिवसेनेनं काँग्रेसचा पाठिंबा घेऊ नये तसेच काँग्रेसने देखील त्यांना पाठिंबा देऊ नये, कारण काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. ते सेनेसोबत गेल्यास, धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून असलेला काँग्रेसचा जनाधार धोक्यात येऊ शकतो, असंही आठवले म्हणाले आहेत. आठवले युतीच्या सरकार बाबती आशावादी असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती बघता त्यांचा आशावाद पूर्ण होईल असे वाटत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here