कोपरगाव: कोपरगाव येथील शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख सुरेश शामराव गिरे (वय 38) राहणार भोजडे चौकी यांची अज्ञात सात ते आठ इसमांनी गोळ्या घालून हत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना तालुक्यातील भोजडे चौकी येथील गिरे यांच्या राहत्या घरी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली असल्याचे समजते.
गिरे यांच्या शरीरात गोळ्या घुसल्या असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, सायंकाळी गिरे हे आपल्या घरी असताना स्विफ्ट डिझायर गाडीतून आलेल्या सहा व एका पल्सर गाडीवर आलेल्या दोघांनी गाडीतून उतरून त्यांच्या घरावर व खिडकीवर गोळ्या झाडल्या. दरम्यान आपल्याला मारण्यासाठी कोणीतरी आले आहे हे समजल्याने गिरे यांनी घराच्या मागच्या दरवाजाने पळ काढला मात्र मागील दाराजवळ सुद्धा काही जण उभे होते. गिरे शेतात पळत जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे आल्याचे समजते.
घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी भेट दिली असून पोलीस निरीक्षक अनिल कटके हेदेखील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. सदर हत्याकांड मुळे शिवसेनेसह तालुक्यसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील हे देखील घटनास्थळी रवाना झाले.