मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी हे चांगलेच संतप्त झाले आहेत. पालिकेच्या निर्णयावर बोलताना शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्यानं शिवतीर्थीवरच होणार असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले आहे. तर पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळत आहेत, हा डाव भाजपाच्या माध्यमातून खेळला जातोय अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पालिकेने दिलेल्या निर्णया अगोदरच शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. शिंदे गटाला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय. भाजपामध्ये सुद्धा अनेक चेहरे आहेत. पण त्यांच्या नावाने मतं मिळणार नाही अस जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा बाळासाहेबांचे विचार पुढे केले जात आहे असा आरोप पेडणेकर यांनी शिंदे गट तसेच भाजपावर केला. त्यामुळे रडी आणि कळीचा डाव खेळला जातोय. हा डाव भाजपच्या माध्यमातून खेळला जात आहे. शिवसेनेसाठी शिवतीर्थ हा परंपरेचा भाग आहे. गेली 56 वर्षे कोविडची 2 वर्षे सोडली तर दसरा मेळावा हा शिवसेनेचाच असे समीकरण आहे. मात्र कालच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर लगेच मनपाने आज परवानगी नाकारली.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.