रेडा – इंदापूर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विविध छावण्या तसेच पूरग्रस्त भागाची इंदापूर तालुक्यातील विविध गावात जाऊन पाहणी केली. पाहणी करण्यात आलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, उपतालुका प्रमुख अरुण पवार, युवा सेना जिल्हा चिटणीस सूरज सानप, युवा सेना इंदापूर तालुका युवाधिकारी संदीप चौधरी, युवासेना उप तालुका अधिकारी अभिजीत पाटील, प्रवीण मोरे, शिवसैनिक उपस्थित होते. रेडणी येथील चारा छावणीमध्ये काही शेतकऱ्यांनी नितीन शिंदे यांना अडचणी सांगितल्या. शिंदे यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणीचे निवारण करून दिले.
प्रभातमध्ये मागील दोन दिवसांपूर्वी पिठेवाडी येथील शेतकऱ्याचे शेततळे वाहून गेले, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत थेट शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पिठेवाडी येथे पूरग्रस्तांची पाहणी केली. पिटेवाडी येथील नदीपात्रालगत जनार्दन मासाळ यांच्या शेततळ्याचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या दिरंगाईबाबत शिंदे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ शेतकऱ्याच्या शेततळ्याची पाहणी करून त्याचा पंचनामा करण्यात यावा, असे सांगितले.