मुंबई: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार टोलेबाजी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फक्त 36 तासांच्या भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्या भेटीबद्दल देशभरात कमालीची उत्सुकता वगैरे शिगेला पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ते काही तितकेसे खरे नाही. असं सांगतानाच या 36 तासांच्या दौऱ्यात ट्रम्प पती-पत्नी दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करतील. मग मोदी सरकारने केलेल्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
ट्रम्प यांच्या भेटीवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकामध्ये अत्यंत तिरकस शैलीत भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. ट्रम्प यांचा दौरा व्यापारवाढीसाठी आहे. म्हणजे आयात-निर्यात, देवाण-घेवाण यावर भर दिला जाईल. अमेरिकेच्या बाबतीत देवाण कमी व घेवाण जास्त झाली तर रुपयास बळकटी येईल. कारण अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कोसळलेलाच आहे. देशातील बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक मंदीचा कहर सुरू आहे. ट्रम्प यांच्या तासांच्या भारत भेटीने हे सर्व प्रश्न सुटणार नाहीत. तरीही प्रे. ट्रम्प या पाहुण्याचे स्वागत करायला हवे. पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नयेत. ट्रम्प महाराज यावे, तुमचे स्वागत आहे, असा खोचक टोलाही शिवसेनेने भाजपला हाणला आहे.