सोनू सूद यांच्यावरील कारवाईचा शिवसेनेने केला निषेध

मुंबई – गोरगरिबांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद यांच्यावर केंद्र सरकारने आकसाने जी आयकर छाप्याची कारवाई केली आहे त्याचा शिवसेनेने निषेध केला आहे. जो माणूस चांगल्या कामाबद्दल आधी भाजपला प्रिय होता

तोच माणूस आता त्यांच्यासाठी करचुकवेगिरी करणारा ठरला आहे असे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात हा आरोप करण्यात आला आहे.

स्वत:ला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाला काही बाबतीत आपले मनही मोठे करायला हवे आहे, अशी सूचनाही शिवसेनेने भाजपला केली आहे. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवरील खोट्या कारवाया,

बारा आमदारांची नेमणूक राज्यपालांमार्फत रोखून धरणे, सोनू सूद यांच्यासारख्यांवर आयकराचे छापे टाकणे हे कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे, असेही सेनेने म्हटले आहे.

सोनू सूदने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात शेकडो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेऊन सोडण्याची मोठी कामगिरी पार पाडली आणि त्यावेळी भाजपने सोनू सूद यांचे कौतुक करून महाविकास आघाडीवर टीका केली होती.

जे सोनू सूद करू शकतो ते महाविकास आघाडी का करू शकत नाही, असा सवाल भाजपने केला होता, पण आज जेव्हा सोनू सूद हे केजरीवाल सरकारसाठी ब्रॅंड ऍम्बॅसिडर बनले त्यावेळी लगेच भाजपला ते डाचायला लागले,

अशी टिप्पणीही सेनेने केली आहे. जे लोक भाजप विरोधी गटांशी जोडले जातात त्यांच्यावर लगेच कारवाई करणे ही भाजपची रितच झाली आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.