Shiv Sena PCMC – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची निवड करण्यात आली. शनिवारी झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या बैठकीत विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली.महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. गटनेता निवडण्यासाठी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांची पक्षाने नियुक्ती केली होती. त्यानुसार खांडभोर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेना नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे.शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक निलेश बारणे, निलेश तरस, विश्वजित बारणे, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, रेश्मा कातळे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विश्वजित बारणे नव्या चेहऱ्यास संधी विश्वजीत बारणे हे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र असून पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. प्रभाग २४ मधून त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली आणि जिंकली. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आणि शिवसेनेचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या अनुभवी सुलभा उबाळे यांचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे संघटनात्मक बांधणीसोबतच महापालिकेच्या कामकाजाचा देखील प्रदीर्घ अनुभव आहे. परंतु पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या विश्वजीत बारणे यांना संधी देण्यात आली आहे. “शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे आणि सर्व नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. या सर्वांचा विश्वास पात्र ठरवेल. सभागृहात शिवसेनेचा आवाज दिसेल. शहराच्या विकासाच्या निर्णयाला शिवसेनेचा नेहमीच पाठिंबा राहील. मात्र, चुकीच्या कामाला तेवढ्याच आक्रमकपणे विरोध केला जाईल.” – विश्वजीत बारणे, शिवसेना गटनेते