मुंबई : राज्यात सध्या शिवसेना पक्षनाव आणि त्यांच्या निवडणूक चिन्हाचा वाद सुरु आहे. हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळे तेथील निर्णय आल्यानंतर पुढील रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत आज संपणार आहे.त्यामुळे आता आज पक्षाकडून काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांची २०१८ मध्ये पक्षप्रमुखपदी निवड झाली होती, तीच मुदत आज संपुष्ठात येत आहे. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना कोणाची, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेला आहे. यावर ३० जानेवारी सुनावणी आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी आयोगाचा निर्णय होऊ शकतो. याबाबत खासदार अनिल देसाई म्हणाले, की ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदासाठी मुदतवाढ द्यावी आणि पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्याव्यात, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली आहे. त्यावर त्यांनी निर्णय दिलेला नाही.
आज मुदत संपत असल्याची बाब तांत्रिक आहे. आयोगाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे, तसेच आयोगाचा निर्णय काहीही झाला, तरी उद्धव ठाकरे हेच आमचे पक्षप्रमुख आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी ठणकावले.
दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार आहे. या वेळी भाजप आणि शिंदे गटाविरोधातील लढाई आणखी तीव्र करण्याबाबत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले.