पिंपरी: शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राडा

माजी खासदारांच्या नावाने शिवीगाळ; महिला पदाधिकाऱ्यास मारहाण, विनयभंग

पिंपरी  – निवडणुका येताच राजकीय पक्षांमध्येच आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र, पक्षांतर्गत धुसफूस आता उग्र होऊन हाणामारी, शिवीगाळ करण्यापर्यंत पोहचली आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी बैठकीत एका माजी शहर प्रमुखाने माजी खासदारांचे नाव घेऊन शिवीगाळ केली.

यास आक्षेप घेणाऱ्या महिला पदाधिकाऱ्याच्या थोबाडीत मारली. यावरून संतप्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी माजी शहर प्रमुखाला चोप दिला. एवढेच नव्हे तर त्यांची कपडे फाडून त्याला पोलिसाच्या ताब्यात दिला. त्या महिलेने विनयभंगाची फिर्याद दिली. ही घटना बुधवारी (दि. 2) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

बाजीराव लांडे (वय 60, रा. लांडेवाडी, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. याबाबत 47 वर्षीय पदाधिकारी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीसाठी पक्षाचे मतदारसंघातील ज्येष्ठ आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी कार्यकर्ते बैठकीत त्यांचे मत मांडत होते. यावेळी लांडे याने एका माजी खासदारांबाबत अर्वाच्य भाषा वापरली. यामुळे फिर्यादी यांनी लांडे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने फिर्यादी यांच्यासोबत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना धक्‍काबुक्‍की केली. तसेच फिर्यादी यांच्या थोबाडीत मारत त्यांचा विनयभंग केला. एक कार्यकर्ता हे भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपीने त्यांनादेखील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी माजी शहर प्रमुखाला जाब विचारत त्याचे कपडे फाडले. तसेच त्यास पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी लांडे याला ताब्यात घेत त्यास वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या मारहाणीत लांडे यांच्या डोळ्याला मार लागला असून रक्‍तदाबही वाढला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याचे समजताच खासदार श्रीरंग बारणे यांनी निगडी पोलीस ठाण्यात जाऊन महिला पदाधिकाऱ्याची भेट घेतली. मोठ्या संख्येने शिवसैनिक पोलीस ठाण्यात जमा झाले होते. तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील महिला पदाधिकाऱ्याची भेट घेत पाठिंबा व्यक्‍त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.