खेड पंचायत समितीच्या इमारतीचा वाद थेट मंत्रालयात धुमसतोय : आजी-माजी आमदार जिद्दिला पेटले
रोहन मुजूमदार
पुणे – महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वाद काही केल्या शमताना दिसत नाही. उलट आता हा वाद थेट मंत्रालयात धुमसतो आहे. खेड पंचायत समितीची इमारत उभारण्यास शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार मंजुरी देतात तर राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ स्थगिती देतात. त्यामुळे ज्याप्रमाणे युतीत शिवसेनेला जे भोगावे लागलेच तिच स्थिती आता महाविकास आघाडीत पुन्हा आल्याने शिवसैनिक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
खेडमधील आजी-माजी आमदारांचा वाद मंत्रालयात पोहोचण्याचे कारण पंचायत समितीची नवीन इमारात. माजी आमदार सुरेश गोरे यांचे म्हणणे आहे की, इमारात महायुतीच्या काळात मंजुर असून निधीपण जिल्हा परिषदेकडून येवून पडला आहे. तर आमदार दिलीप मोहिते यांचे म्हणणे आहे की, पंचायत समितीची नवीन इमारत ज्या ठिकाणी मंजूर आहे, ती जिल्हा परिषदेची जागा असून त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय इमारत उभी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पंचायत समितीची इमारत लवकारात लवकर उभी करावी, यासाठी शिवसेनेहे आधीही व शुक्रवारी (दि. 18) शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंदोलन केली आहेत.
दरम्यान, मध्यतरी इमारतीसाठी पंचायत समिती परिसरातील झाडेही कापले. तरीही काम सुरू न झाल्याने शिवसैनिकांनी थेट खासदार संजय राऊत यांच्याकडे धाव घेतली. तर त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पत्र लिहिल्यानंतर सत्तार यांनी जिल्हा परिषदेला काम सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आमदार मोहिते यांनी मंत्री मुश्रीफांकडे धाव घेतली.
मुश्रीफांनी 4 मे 2020 शासन निर्णयाचा दाखल देत कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नवीन बांधकाम हाती घेता येणार नाही, सध्या बांधकाम स्थगित ठेवा स्थिती पूर्वतवत झाल्यावर शासन आदेशाप्रमाणे कारवाई करा, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रही दिले व मी सांगितल्यानुसारच कार्यवाही करा, असे फोनद्वारेही सांगितले असल्याने आता या राजकीय नाट्याचा पुढील अंक काय पाहयला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
- शिवसेनेचा ‘चंग’ तर राष्ट्रवादीचा ‘हेका’
युती सरकारने पंचायत समितीची नवीन इमारत मंजुर केली आहे. मात्र, त्यास राजगुरूनगर नगरपरिषदेची परवानगी नसल्याचे मुश्रीफ यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे या वादात शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उडी घेत नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले त्यामुळे शिंदे यांनी नगरपरिषदेस संपर्क करून परवानगी देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे काम सुरू करण्याचा ‘चंग’ शिवसेनेचा कायम असून काम होऊ देणार नाही असा ‘हेका’ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे, त्यामुळे आगामी काळात हे राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. - ‘बाण’ बोथट करण्यासाठी ‘घड्याळा’चे काटे सुसाट?
खेड तालुका पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. सध्य परिस्थितीत जिल्ह्यात शिवसेनेचा ना आमदार ना मंत्री कार्यरत आहे. हीच नामी संधी साधत शिवसेनेचा “बाण’ बोथट करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या “घड्याळा’चे काटे जोरजरात फिरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. - ‘राजकारणात’ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मरण
ग्रामविकास राज्यमंत्री पहिले काम करा असे सांगतात त्यानंतर ग्रामविकासमंत्री काम स्थगित करण्याचे आदेश देतात. त्यामुळे नक्की कोणाचे ऐकायचे या द्विधामनस्थितीत प्रशासकीय यंत्रणा अडकते. राजकीय पक्षांच्या राजकारणात अनेक कामे ही ‘लालफिती’तच वर्षोनोवर्षे अडकून राहतात हेच यावरून सिद्ध होते.
मंत्रालयातून जो काही निर्णय येईल, त्याचे पालन केले जाईल.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे