कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्या राजू शेट्टी यांचा पराभव केला ते शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी खुद्द राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच घरी जाऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका परंपरेचा पायंडा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पडला आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींसोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. “मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, तुमचा आशीर्वाद राहू दे, असे धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या आईला म्हणाले. यावर “माझा आशीर्वाद लय मोठा आहे. माझा लेक सर्वांना धरुन आहे, तसे तुम्हीही लोकांना धरुन राहा, असा आशीवार्द राजू शेट्टींच्या आईने धैर्यशील माने यांना दिला.
यावेळी राजू शेट्टी यांची भेट घेताना शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नूतन खासदार माने यांचे स्वागत माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.