बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. हा वाद मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी आणखी एक नवे वक्तव्य केले आहे. यादरम्यान मी माझे शब्द मागे घेण्यास तयार आहे मात्र त्यांनी एक अट घातली आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
“राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं त्यावरुन त्यांनी चैत्यभूमीवर जावून माथा टेकून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी:, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे. “राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जावून माफी मागावी. राहुल गांधी यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार”, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत.
संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य
जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल असे संजय गायकवाड म्हणाले होते.