रत्नागिरी: “निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला असून या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार योगेश कदम यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे शिवसेनेकडून खेड-दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. निसर्ग चक्रीवादळाला आज एक महिना पूर्ण झाला. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, फळबागा, कृषीविषयक उद्योग, पर्यटन उद्योग व इतर महत्त्वपूर्ण विषयांसाठी ही भेट झाल्याचे कदम यांनी ट्विटरवरून सांगितले.
वादळात घरांप्रमाणे मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान
झाले आहे. या नुकसानग्रस्त बागायतीच्या प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी मागणी योगेश कदम यांनी केली.
त्याचप्रमाणे शेती कर्ज घेतलेल्या बागायतदारांची कर्ज माफ करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी प्रत्येक झाडामागे मदत देण्यासाठी सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.