नगर – शहरातील रस्ते दुरुस्तीसह शहर स्वच्छता व मूलभूत नागरी सोयीसुविधांबाबत शिवसेनेनेही या प्रश्नांसंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. कचरा, खड्डे, पथदिवे, मोकाट जनावरांचा प्रश्न 15 दिवसांत न सोडविल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला.
शिवसेना नगरसेवकांनी मंगळवार (दि.5) दुपारी मनपा उपायुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी योगीराज गाडे, नीलेश भाकरे, अशोक बडे, कमल सप्रे, संजय शेंडगे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संभाजी कदम, मंगल लोखंडे, दत्ता कावरे, सुवर्णा गेनप्पा, प्रशांत गायकवाड, विद्याखैरे, अनिल शिंदे, विजय पठारे, अमोल येवले आदी नगरसेवक उपस्थित होते. सतत पडणाऱ्या पावसाने सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. नागरिकांना रस्ता कोणता व खड्डे कोणते हे शोधावे लागत आहे. शहर व उपनगरातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे. शहरात स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. अधिकारी व पदाधिकारी यांच्यात समन्वयच राहिला नाही.
केंद्राकडून मिळणारे गुणांक खाली येत चालले आहेत. सर्वत्र कचराच कचरा दिसत आहे. मोकाट जनावरांची दहशत वाढली आहे. यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील सर्व पथदिवे बंद आहेत. दुरूस्तीसाठी साहित्य नाही. प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. या सर्व प्रश्नांची 15 दिवसांत सोडवणूक न झाल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला.