शिवसेनेला भिवंडीत मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

भिवंडी – ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सेनेची वाट सोडली आहे. म्हात्रे यांनी शिवसेना पक्ष सदस्य पदासह जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळ खळबळ उडाली आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत म्हात्रे यांनी आपला राजीनामा दिला असला तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून पक्षाणे कोणतीही जबाबदारी सोपविली नाही त्यामुळे म्हात्रे नाराज होते.

सुरेश म्हात्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे शनिवारी दिला आहे. म्हात्रे यांचा येथील ग्रामीण राजकारणात चांगला दबदबा आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे सेनेला या भागात मोठी खिंडार पडणार आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरेश म्हात्रे यांना सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल 2 वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. त्यामुळे म्हात्रेसह त्यांचे समर्थक सेनेवर नाराज होते. अखेर म्हात्रे यांनी आपले व्यक्तिगत कारण पुढे करत राजीनामा दिला आहे.

सेनेचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश म्हात्रे हे कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्याचे कारण मागील काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे म्हात्रे यांच्या घरी गेले होते. तेव्हा पासून म्हात्रे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. असे असताना आज म्हात्रे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते कॉंग्रेससोबत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा राजीनामा दिला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.