Raj Thackeray । Maharashtra Assembly Election 2024 – गद्दारी करणारे आधी मान खाली घालून जायचे. आता मात्र त्यांना काहीच वाटत नाही. मतांचा अपमान करुन देखील तुम्ही शांत बसत असेल तर देवच वाचवेल या महाराष्ट्राला. शरद पवार यांनी फोडाफोडीचे राजकारण सुरु केले.
आता तर पक्ष आणि चिन्हच ताब्यात घ्यायचे. असे कधी पाहिले नव्हते. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नाव आणि चिन्ह घेतले. शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे किंवा शिंदेची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचे हिंदूहृदयसम्राट काढून टाकल्याची टीका केली.
काही ठिकाणी बाळासाहेबांच्या नावापुढे जनाब लावल्याने देखील राज ठाकरे यांनी टीका केली. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.
राज ठाकरे म्हणाले, वेगळ्या विचारांची युती आणि आघाडी होती. पण सर्वात लाजीरवाणी गोष्ट उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानंतर बाळासाहेबांच्या पुढचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले. काही ठिकाणी तर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलेले मी पाहिले.
स्वत:च्या स्वार्थासाठी इतक्या खालपर्यंत गेले तुम्ही. सभापतींना तेव्हा सांगितले होते बाळासाहेबांचे एक चित्र विधानभवन आणि विधानपरिषदेच्या सभागृहात लावा. त्यांना कळेल आपण इथपर्यंत कोणामुळे आलो. हे इकडे बघत होते तिकडे ४० निघून गेले.
मुख्यमंत्र्यांना पत्ता नाही आपले ४० आमदार गेले. हे आमदार घेऊन जाणारे एकनाथ शिंदे म्हणाले होते, काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासोबत बसणं म्हणजे श्वास घेता येईना. पण नंतर अचानक कळले मांडीवर अजित पवार येऊन बसले. कोणते राजकारण सुरु आहे, अशी टीका त्यांनी केली.