मुंबई : राज ठाकरे यांचा मनसे पक्ष भाजपाची दुसरी शाखा असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतीच केली होती. त्यांच्या याच टीकेला आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. शिवसेना ही शरद पवार यांच्या पिंजऱ्यातील मांजर आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे, त्याबद्दल शिवसेना काही बोलणार का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे. यावेळी बोलताना देशपांडे यांनी,” यांच्या (उद्धव ठाकरे गट) पायाखालची वाळू सरकली आहे. हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणत आहेत. आपण स्वत: कोण आहोत हे एकदा शिवसेनेने पाहावे. शिवसेना शरद पवार यांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झाली आहे”, असे संदीप देशपांडे म्हणाले.
“शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेतृत्व खूप जुने झाले आहे. आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत. मात्र राष्ट्रवादी शिवसेना संपवत आहे, त्याचं काय? “असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांनी मनसे तसेच राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून फिरत होते. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावणार होते. मात्र, एकाही भोंग्यासमोर हनुमान चालीसा म्हटली गेली नाही, असे अंबादास दानवे म्हणाले.