मुंबई – विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड यश मिळवलेल्या महायुतीचा मुख्यमंत्री कोण, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसह मार्गी लागला असला तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच अद्याप सुटला नाही. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यानंतर शिंदेंची शिवसेना आता गृहमंत्रालयासाठी आडून बसली आहे. अशातच खातेवाटपाबाबतचे चित्र रविवारपर्यंत (८ डिसेंबर) स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे, नवनिर्वाचित मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी ११ किंवा १२ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत आहेत.
मुख्यमंत्रीपद भाजपला आता महत्वाच्या मंत्रिमंडळांसाठी वाटाघाटी
महायुतीत भाजप, शिवसेना, आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश असून निवडणुकीत २३० जागांवर विजय मिळवलेल्या या आघाडीने विरोधी महाविकास आघाडीचा अक्षरशः पालापाचोळा केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. आता, मंत्रिमंडळांच्या वाटपासाठी युतीच्या घटक पक्षांमध्ये वाटाघाटींचे सत्र सुरू आहे.
गृहमंत्रालयासाठी शिवसेनेचा आग्रह
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी उघडपणे गृहमंत्रालयाची जबाबदारी शिंदेंच्या शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला २१-२२ मंत्रालये तर शिवसेनेला ११-१२ आणि अजित पवार गटाला ९-१० मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु असल्याने या प्रमुख खात्याची जबाबदारी कोणाकडे जाईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रचंड बहुमताचा मंत्रिमंडळाच्या रचनेवर परिणाम
महायुतीच्या तीन घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. त्यामुळे सर्वांना समाधान देणारी मंत्रिमंडळ रचना करणे, हे नेतृत्वासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. राज्य मंत्रिमंडळात ४३ मंत्री असू शकतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळावे, यावर सध्या अंतर्गत चर्चा सुरू आहेत.
विशेष अधिवेशन आणि विश्वासदर्शक ठराव
महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. ९ डिसेंबरला अध्यक्षपदाची निवड होणार असून त्यानंतर नवीन सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना आणि अजित पवार गटांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.