शिवसेनेला मिळणार सत्तेत वाटा?

महापालिका विषय समिती, प्रभाग समिती निवडणुकीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे – लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाल्याने महापालिकेतही सत्ता समिकरणे बदलली आहेत. गेली दोन वर्षे महापालिकेत भाजपच्या विरोधात दंड थोपाटून शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत विरोधीपक्षाची भूमिका बजावली असतानाच; लोकसभेत या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत काम केले आहे. मात्र, त्यानंतर आता लगेच महापालिकेच्या 15 प्रभाग समित्यांच्या तसेच 4 विषय समित्यांच्या निवडणुका होत असल्याने भाजपकडून शिवसेनेला सत्तेत वाटा देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या रिपाइंला भाजपने सत्तेत सहभागी करून घेतले आहे. त्यानुसार रिपाइंकडे उपमहापौरपद आले आहे. याशिवाय यावर्षी स्थायी समितीत रिपाइंच्या एका सदस्यालाही संधी देण्यात आली आहे. त्यात आता गत विधानसभा निवडणुकीपासून एकमेकांच्या विरोधात उभे असलेले भाजप आणि शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही अपवाद वगळता शिवसैनिकांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे दोन्ही पक्षात चांगलेच मनोमिलन आहे. मात्र, किमान शहराच्या पातळीवर दोन्ही पक्षातील हे मनोमिलन किती दिवस कायम राहणार की पुन्हा ते एकमेकांच्या विरोधात उभे राहणार हे येत्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेची विविध पदांची मागणी
या दोन्ही पक्षांची युती जाहीर होताच शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले आहे. त्यात पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद, एक वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद, चार विषय समित्यांपैकी प्रत्येक वर्षी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद आणि दोन प्रभाग समितींची अध्यक्षपद अशा विविध पदांची मागणी केली आहे. त्यामुळे आता निवडणूक संपल्याने या मागणीवर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातच, पुढील आठवड्यात 4 मेला महिला बालकल्याण, शहर सुधारणा, विधी, क्रीडा या विषय समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी 30 एप्रिलला दुपारी 3 ते 5 यावेळेत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे सेनेने केलेल्या मागणीप्रमाणे दोन विषय समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदे भाजप देणार का याचे चित्र लगेचच स्पष्ट होणार आहे. त्यानंतर 6 मेला 15 प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहे. त्यातही सेनेने दोन प्रभाग समितीचे अध्यक्षपद मागितले आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला काय देणार यावर या शिवसेनेचा सत्तेतील वाट ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.