महापालिकेत युती नाहीच; सेनेला ठेवले अध्यक्षपदापासून दूर
शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
वारंवार घोषित करूनही शिवसेनेला महापालिकेतील सत्तेपासून दूर ठेवत डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत युती शहर पातळीवर अभेद्य राहणार की दोघांमध्ये कलगीतुरा रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दोन्ही पक्षातील अंतर्गत कलहाने उभारी घेतल्यास राष्ट्रवादीला पुन्हा सुगीचे दिवस येणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पिंपरी – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपाची युती झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समितीच्या सभापतीपदी शिवसेनेला स्थान मिळेल, अशी चर्चा रंगली असतानाच भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा ठेंगा दाखविला आहे. महापालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने व भाजपाची एकहाती सत्ता आल्याने शिवसेनेला महापालिकेत विरोधी पक्षांमध्ये बसावे लागले होते. मात्र शिवसेना आणि भाजपाची राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरही युती करावी, असा संदेश देण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीत काही ठराविक नेतेमंडळीवगळता शिवसेना आणि भाजपाची युती एकसंध दिसून आली. लोकसभेमध्ये घवघवीत यश मिळाल्यामुळे तसेच महापालिकेतील स्थायी समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला साथ दिल्याने पालिकेत शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडल्या. महापालिकेच्या सहापैकी एखाद्या प्रभागावर संधी मिळेल, अशी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्त्वाची अपेक्षा होती. मात्र प्रभाग समित्यांवर भाजपाच्याच नगरसेवकांना स्थान देण्यात आले होते.
प्रभाग समित्यानंतर होणाऱ्या विषय समित्यांवर शिवसेनेला संधी दिली जाईल, असे घोषित केल्यानंतरही सोमवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीतून शिवसेनेला बाहेरच ठेवण्यात आल्यामुळे महापालिकेत युती नाहीच असा संदेश भाजपाचे दिला आहे. सोमवारी विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा आणि शहर सुधारणा या समित्यांवर भाजपाच्याच सदस्यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आल्यामुळे शिवसेना नेतृत्त्वाचा ठेंगा दाखविण्यात आला आहे.