नवी दिल्ली – शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. लोकसभेतील शिवसेनेचे 12 खासदार बंडखोर शिंदे गटाचा भाग बनले. त्यानंतर त्या गटाने लोकसभेतील नेतेपदी राहुल शेवाळे यांची आणि मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांची निवड केली. त्या निवडींना बिर्ला यांनी मान्यता दिली.
संबंधित निर्णयाला शिवसेनेने म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. लोकसभेतील नेते म्हणून विनायक राऊत आणि मुख्य प्रतोद म्हणून राजन विचारे यांची नावे बिर्ला यांच्याकडे सादर करण्यात आली होती. पण, त्यांनी शिंदे गटाने दिलेली नावे मान्य केली. तो निर्णय अवैध आहे.
राऊत आणि विचारे यांना त्यांच्या पदांवरून एकतर्फीपणे हटवण्यात आले, अशी भूमिका याचिकेतून मांडण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी संबंधित विविध याचिका न्यायालयात दाखल आहेत. त्यावर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यावेळी नवी याचिकाही विचारात घेतली जाण्याची शक्यता आहे.