पुरंदरमध्ये ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व

सेनेकडे दोन तर आघाडीकडे एक ग्रामपंचायत

खळद- पुरंदर तालुक्‍यात तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी (दि.8) पार पडल्या. आज, या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून त्यातील दोन ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या तर एका ग्रामपंचायतीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त पॅनेलला यश मिळाले आहे. पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के यांच्या नावळी गावासह दवणेवाडी आणि धनकवडी या गावांचा यात समावेश होता. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्त्वाचा वर्चस्मा आजही पुरंदरच्या ग्रामीण भागात कायम असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.

यावळी ग्रामपंचायतीत यावेळी तीव्र सत्तासंघर्ष झाला. माजी सभापती अतुल म्हस्के यांची अनेक वर्षांची सत्ता उलथवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असे सर्व पक्ष याठिकाणी एकत्र आले होते. विरोधकांच्या या एकीला चांगले यश मिळताना येथे पाहायला मिळाले. सात पैकी 5 जागा या तीन पक्षांच्या युतीला मिळाल्या तर दोन जागा सेनेला मिळाल्या. सरपंचपदाच्या जागेसाठी मात्र येथे मोठा संघर्ष झाला. यात शिवसेनेच्या विठ्ठल दिनकर म्हस्के यांनी बाजी मारत विरोधी आघाडीच्या भरत छबन म्हस्के यांचा अवघ्या 2 मतांनी निसटता पराभव केला. दवणेवाडी ग्रामपंचायतीच्या 5 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. सरपंच पदासाठी येथेही चुरशीची लढत झाली. कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतीत यंदा शिवसेनेचे शाखाप्रमुख अशोक गुलाबराव खोपडे यांनी स्वतःच दंड थोपटले होते. अशोक खोपडे यांची कॉंग्रेसच्या पल्लवी खोपडे यांच्याशी सरपंचपदासाठी सरळ लढत झाली. यात अशोक खोपडे यांनी 103 मतांनी दणदणीत विजय संपादन करीत पहिल्यांदा सेनेचा झेंडा फडकवला.

गंमत म्हणजे येथे कॉंग्रेसच्या पल्लवी खोपडे यांच्यापेक्षा नोटाला जास्त मते मिळाली. धनकवडी ग्रामपंचायत मात्र यंदा सेनेकडून हिसकावण्यात आघाडीला यश मिळाले. येथे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आघाडी करून अशोक धोंडीबा जगताप यांना पुरस्कृत केले होते. त्यांनी सेनेच्या रोहित राजरत्न जगताप यांचा 124 मतांनी पराभव केला. एखतपूर मुंजवडी ग्रामपंचायतीत एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यात जवळपास 162 इतके मतदान झाले होते. सेनेच्या ममता किरण धिवार यांनी यापैकी 155 इतकी विक्रमी मते घेत दणदणीत विजय मिळवला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)