राष्ट्रवादीच्या नीलेश लंके यांचा 59 हजार मतांनी विजय
पारनेर – पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नीलेश लंके यांनी आश्चर्यकारणरित्या विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांचा 59 हजार 838 मतांनी पराभव केला. औटींचा हा धक्कादायक पराभव मानला जात आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष होते. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी व राष्ट्रवादीचे नीलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होईल, असे चित्र होते. मात्र औटी यांचा 59 हजार 838 मतांनी धक्कादायक पराभव झाला.
औटी यांना या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून पकड निर्माण करता आली नाही. त्यामुळेच निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही. मतदारसंघामध्ये लंके यांनी केलेल्या झंझावती प्रचारामुळे त्यांना विजय मिळू शकला. मतदारसंघातील नगर भागातील चाळीसगावांमधून लंके यांना मोठी आघाडी मिळाली आणि तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला. गेल्या अनेक पंचवार्षिकमध्ये औटी यांना या भागात मताधिक्य मिळत. असे परंतु यावेळेस चित्र पलटलेले दिसले. तसेच पारनेर तालुक्यात देखील निघोज, टाकळी ढोकेश्वर या गटामध्ये देखील औटी यांना मतदान कमी पडले. पारनेर शहरामध्ये अपेक्षापेक्षा औटींना कमी मते पडली. एकंदर संपूर्ण मतदारसंघांमध्ये मतदारांनी शिवसेनेच्या विजय औटी यांना नाकारल्याचे दिसून येते.
सामान्य जनता विरुद्ध प्रस्थापित, असा सामना या निवडणुकीत रंगल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. विजय दृष्टिपथात दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. पारनेर शहरातून विक्रमी जनसमुदायासह लंके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लंके म्हणाले, नीलेश लंके आमदार नाही, तर जनता आमदार आहे. या मतदारसंघात सर्वांत जास्त मतांनी तुमचं पोरगं निवडून आलं आहे. यापुढे तुमची मान खाली जाणार नाही, असे कोणतेही काम करणार नाही. माझ्या अपमानाचा बदला तुम्ही सर्वांनी घेतला. तालुक्यात टीका केली गेली लंके बरोबर टुकार आहेत. मला भिकारी म्हणत होते. पण त्याच भिकाऱ्यांनी तुम्हाला घरचा रस्ता दाखवला. झिंगाट गाण्यावर नाचणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच ही साडेसाती बरं झालं तिकडे गेली, म्हणून सुजित झावरे यांचे नाव न घेता वासुंदेवाले यांचे आभार मानले.
पारनेर मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे. विजयराव औटी (शिवसेना) 80 हजार 125, नीलेश लंके (राष्ट्रवादी) एक लाख 39 हजार 963 (विजयी), ममता साठे (बहुजन समाज पार्टी) 1019, प्रसाद खामकर (जनता पार्टी) 961, डी. आर. शेंडगे (वंचित बहुजन आघाडी) दोन हजार 499, भाऊसाहेब खेडेकर (अपक्ष) 810.