अंबरनाथ – उल्हासनगर मध्ये एका शिवसेनेच्या नगरसेवकाने आपल्या इतर दोन साथीदाराच्य मदतीने तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही मारहाण जुन्या भांडणाचा राग मनात धरून केली आहे. आकाश पाटील असे या नगरसेवकाचे नाव असून रवी जयसिंघानी मारहाण केलेल्या तरुणाचे नाव आहे. शिवसेनेचा नगरसेवक उल्हासनगर महापालिकेतील आहे.
याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रवी जयसिंघानी याने फिर्याद दिली असून शिवसेना नगरसेवक आकाश पाटील, यश पाटील आणि मनीष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेले नाही.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, जुना अंबरनाथ गाव परिसरातील धर्माजी पाटील कॉलनी भागात रवी रात्री सव्वा बाराच्या सुमारास आपल्या घराबाहेर फिरत होता. यावेळी शिवसेना नगरसेवक आकाश पाटील आपले दोन साथीदार यश आणि मनीष यांच्या सह तिथे आला. ‘तू बाहेर का फिरतो आहेस’ असा जाब विचारत रवीला शिवीगाळ करत कमरेला असलेला बेल्ट काढून रवीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर नगरसेवकाच्या साधीदाराने सुद्धा लोखंडी रॉडने रवीच्या पाठीवर छातीवर पोटावर पायावर मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीत रवीचा संपूर्ण शरीरावर काळे निळे डाग पडले असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सोडण्यात आले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.