पुढील 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री – संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असून पुढील 25 वर्षे शिवसेना महाराष्ट्राचे नेतृत्व करणार, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या हितासाठी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून सरकार स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

रुग्णालयातील उपचारानंतर घरी परतलेले संजय राऊत यांची भाजपवर टिका सुरुच आहे. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा भाजपवर हल्ला चढवला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेना सरकार स्थापन करीत असताना या दोन पक्षांसोबत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेणार का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, फक्त पाच नाही तर पुढील 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल. महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावे लागणार आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत ते अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट करतानाच शिवसेनेचा महाराष्ट्राशी संबंध कायमचा जोडला गेलेला आहे. शिवसेना हा गेली 50 वर्षे राज्याच्या राजकारणत सक्रीय आहे. त्यामुळे पुढील सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वातच येणार आहे.

कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नाही,’ असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
सरकार स्थापन करताना शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी 14 आणि कॉंग्रेसला 12 मंत्रिपदे देणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र, सत्तेच्या फॉर्म्युल्याबाबतचा निर्णय घेण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.