पिंपरी – गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेना शाखा प्रमुखाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) रात्री मोहननगर येथे करण्यात आली.
विजय सर्जेराव सूर्वे (वय 38, रा. बालाजी हाईटस्, मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी विद्यासागर भोते यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुर्वे हा मोहननगर शिवसेना शाखाप्रमुख आहे. गुरुवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सुर्वे याने दारू पिऊन गोंधळ घातला. यामुळे त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात पाठविले. त्यांच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढल्याने त्याच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप
दरम्यान या प्रकरणाच्या विरोधात सुर्वे यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात सुर्वे यांनी म्हटले आहे की, त्यांचे मोहननगर परिसरात वॉशिंग सेंटर असून पोलीस अधिकारी अन्सार शेख यांना फुकटात मोटार धुवून देत नसल्याने त्यांनी आपल्याला या खोट्या प्रकरणात अडकविले आहे. मात्र अन्सार शेख यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना या आरोपाचे खंडन केले असून आपल्या घरी मोटार धुण्यासाठी गेल्या एक वर्षापासून नेपाळी व्यक्ती असल्याचा खुलासा केला आहे.