शिवसेना उमेदवाराच्या वाढत्या मतांचा कॉंग्रेसला धसका

कराड दक्षिणला आगामी विधानसभा जड जाण्याचे संकेत, युतीच्या गोटात आनंदीआनंद
कराड दक्षिण : लोकसभा निवडणूक निकाल विश्‍लेषण
उमेश सुतार

कराड – लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदान झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गत पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा 4. 47 टक्‍क्‍यांनी मतांचा आकडा वाढल्यामुळे या वाढत्या आकड्यांचा कॉंग्रेसने चांगलाच धसका घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिणची ही वाढलेली मते थेट शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या पदरात पडल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. साहजिकच आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेसला जड जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निकालामुळे मात्र युतीच्या गोटात आनंदीआनंद असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत या मतदारसंघाने अपक्ष पुरूषोत्तम जाधव यांना चांगलीच साथ दिली.

यावेळी एकूण 2 लाख 69 हजार 920 मतदानापैकी 1 लाख 55 हजार 271 इतके मतदान झाले होते. यामध्ये उदयनराजे भोसले यांना 61 हजार 648 मते मिळाली होती. तर अपक्ष पुरूषोत्तम जाधव यांना 52 हजार 584 मते मिळाली होती. युतीचे उमेदवार अशोक गायकवाड यांना 7 हजार 608 मते मिळाली होती. यावेळी आपचे उमेदवार राजेंद्र चोरगे यांनी तिसऱ्या स्थानावर राहिले होते. सन 2014 च्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी 56.78 इतकी होती. यावेळी झालेल्या निवडणुकीत 2 लाख 88 हजार 957 मतदारापैकी 1 लाख 82 हजार 372 इतके मतदान झाले आहे. या मतदानाची टक्केवारी 60.33 असल्याने वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार अशी मतदारसंघात यापूर्वीच चर्चा सुरू होती.

अपेक्षेप्रमाणे भाजपाचे डॉ. अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केवळ पक्षनिष्ठा जपत युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचेच काम केले. तसेच याच मतदारसंघातील ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटानेही नरेंद्र पाटील यांनाच साथ दिल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रत्यक्षात मताचा वाढलेला टक्का युतीकडेच झुकल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

विधानसभेची रंगीत तालीम

गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, अपक्ष विलासराव उंडाळकर व भाजपचे डॉ. अतुल भोसले अशी तिरंगी लढत झाली. सुमारे 16 हजारांच्या मताधिक्‍क्‍याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले. आगामी निवडणुकीसाठी सद्यःस्थितीत पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले हेच भाजपचे उमेदवार राहतील. मात्र हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेच्या वाट्याला असल्यामुळे तो पुन्हा शिवसेनेला सोडण्याची मागणी होऊ लागली आहे. ऍड. उदयसिंह पाटील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून ते शिवसेनेचे उमेदवार होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात विधानसभेसाठीच्या जोरबैठकांची रंगीत तालीम सुरू असल्याचेही चित्र लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने पाहावयास मिळाले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, भाजपकडून डॉ. अतुल भोसले आणि रयत संघटनेचे उमेदवार म्हणून ऍड. उदयसिंह पाटील -उंडाळकर हेच उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या सर्वांनी या निवडणुकीत विधानसभेची रंगती तालीम म्हणूनच काम करून प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधला होता.

उदयनराजे भोसले यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, ऍड. राजाभाऊ उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते यांच्यासह मधल्या काळात मलकापूर नगरपालिका निवडणूक भाजपाच्या व्यासपीठावर बसलेल्या कराड पालिकेतील जनशक्‍ती आघाडीच्या सतरा नगरसेवकांनी पक्षनिष्ठा, गटतट बाजूला ठेवून काम केले. मात्र त्यांना याठिकाणी मताची आघाडी घेता आलेली नाही. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी मित्रपक्षाला फटका बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)