शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
– विशाल करंडे
लाखणगाव – राज्यभर निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे वातावरणही तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, त्यांच्या विरोधात शिवसेनेचा अजूनही उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना नेहमीप्रमाणे रंगणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील हे निवडणूक लढविणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे याठिकाणी प्राबल्य आहे. परंतु, त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी शिवसेनेनेही जोरदार तयारी केली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जनसंपर्क वाढविला आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे सहावेळा या मतदारसंघातून निवडून आले असून ते सातव्यांदा पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत.
युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला येत असल्याने या ठिकाणी शिवसेनेकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत अजूनही निश्चित झाले नाही. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर राहावे लागले होते. त्यामुळे विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी अवघड मानला जात आहे. आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. मंचर गणाचे पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले याठिकाणी अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी वाढवल्या आहेत. मागील वेळी दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध निवडणूक लढलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांचे नाव पुढे येऊ शकते. परंतु, अरुण गिरे यांनीही उमेदवारीबाबत आग्रह धरलेला नाही. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे शिवसेनेच्या संपर्कात असून शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने कोण निवडणूक लढवणार याबाबत अजून तरी संभ्रम आहे.
शिरूर तालुक्यातील मतदान महत्त्वाचे
राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित असल्याने दिलीप वळसे पाटील यांनी जनसंपर्क वाढवला असून त्यांची मुलगी पूर्वा वळसे पाटील या मागील अनेक दिवसांपासून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 39 गावांचा समावेश होत असल्याने शिरूर तालुक्याचे मतदानही महत्त्वाचे आहे.