मंचर – घोडेगाव येथे झालेल्या शिवसेना पक्षाच्या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध वैयक्तिक शिवीगाळ व मानहानी करुन अर्वाच्च भाषेत वक्तव्ये केल्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाराम भिवसेन बाणखेले यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
राजाराम बाणखेले यांनी अधिकृत अर्ज दाखल केल्यानंतर घोडेगाव येथे महाराणी लक्ष्मीबाई चौकात शुक्रवारी (दि. 4) झालेल्या सभेत त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध वैयक्तिक शिवीगाळ व मानहानी केल्याचे वक्तव्य केले. याबाबत निवडणूक आयोगाच्या एफएसटी या फिरत्या पथकाचे प्रमुख संदीप सुदाम म्हसळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावेळी पथकाने केलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करून बुधवारी (दि. 9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी डी. एच. वाघोले करीत आहेत.