‘भोसरी’वर शिवसेनेची दावेदारी

शिरूर, हडपसरसाठी देखील आग्रही
पिंपरी – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार हे निश्‍चित असले, तरीसुध्दा भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. त्याशिवाय, शिरूर, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ देखील शिवसेनेला मिळावेत, यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत, अशी भूमिका सोमवारी (दि. 9) शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

.. तर लांडगे यांनी शिवसेनेत यावे

शिवसेनेने भोसरी मतदारसंघावर दावा केला आहे. या मतदारसंघातून भाजप संलग्न अपक्ष आमदार महेश लांडगे निवडून आलेले आहेत. शिवसेनेने भोसरीवर दावा केल्याचा अर्थ आमदारांना विरोध आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर माजी खासदार आढळराव-पाटील म्हणाले, “”आमचा आमदारांना अजिबात विरोध नाही. त्यांनी शिवसेनेकडून ही निवडणूक लढवावी. तसेच, युतीच्या जागा वाटपात भोसरी विधानसभा भाजपकडे गेल्यास आम्ही सर्वजण मित्र पक्ष असलेल्या भाजपचेच काम करू.” यावेळी भोसरीतून इच्छुक असलेले इरफान सय्यद आणि धनंजय आल्हाट तिथेच उपस्थित होते. आपल्यासमोरच लांडगेंना शिवसेनेत आमंत्रण दिले जात असल्याचे पाहून दोघांच्याही भुवया उंचावल्या.

मुंबईत आज मुलाखती

पश्‍चिम महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी (दि. 10) मुंबईत मातोश्रीवर होणार आहेत. शिरूर लोकसभेतील भोसरी, हडपसर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड-आळंदी आदी जागांसाठी या मुलाखती होणार आहेत. शिवसेनेकडून भोसरी मतदारसंघातून सह-संपर्कप्रमुख (शिरूर) इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट हे प्रबळ इच्छुक आहेत.

युतीच ठरतय की बिनसतय? अशा चर्चा असतानाच शहरात मात्र भाजप-शिवसेनेकडून स्वतंत्र दावे केले जात असल्याने दुफळी वाढत चालली आहे. पिंपरी विधानसभेत शिवसेनेने गत निवडणुकीत विजय मिळविला असल्याने पिंपरीवर शिवसेना हक्‍क सांगत आहे आणि भोसरीवरही दावा केल्याने शहरात भाजपला केवळ एकच जागा देण्याचे शिवसेनेचे प्रयत्न दिसत आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा पराभव झाला असला तरी आमची ताकद कायम आहे. शिवसैनिक हे फक्‍त झेंडे उचलणार नाहीत. भोसरी मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून शिवसैनिकांच्या भावना मांडल्या जातील, असे आढळराव-पाटील यांनी स्पष्ट केले. शिरूर संघटिका सुलभा उबाळे, सह-संपर्कप्रमुख (शिरूर) इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, निलेश मुटके, आबा लांडगे आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, शिवसेनेने यापूर्वी 2009 मध्ये युती असताना विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर 2014 मध्ये युती नसतानाही शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती.

सद्य:स्थितीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत भोसरी मतदारसंघातून नगरसेवक निवडून आले नसले तरी शिवसेनेचे मतदान वाढले आहे. सतत भोसरी विधानसभेने खासदारकीच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवार असताना देखील “लीड’ दिला. भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर याठिकाणी शिवसेनेचाच आमदार येईल, अशी खात्री वाटत असल्याने हा मतदारसंघ भाजपला सोडू नये, अशी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. भोसरी हा शिवसेनचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे तो शिवसेनेकडेच राहावा, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)